कराड (सातारा) : साताऱ्यातील पाटण तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका आठ वर्षीच्या चिमुरडीवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला ( Rape Eight Year Old Girl In Patan ) आहे. आई - वडील पुण्याला असल्याने मुलगी आजीकडे राहत होती. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
पाटण तालुक्यातील आठ वर्षांची ही मुलगी बुधवारी सायंकाळी बेपत्ता झाली होती. आजीने ग्रामस्थांच्या मदतीने परिसरात तिचा शोध घेतला. मात्र, सापडली नसल्याने कुटुंबीयांनी ढेबेवाडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. त्यानंतर पुन्हा मुलीचा शोध सुरू झाला. सुतारवाडी गावापासून डोंगराकडे जाणार्या रस्त्यावर मध्यरात्री बेपत्ता मुलगी मृतावस्थेत आढळली. तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. तिथे वैद्यकीय तपासणी केली असता तिच्यावर बलात्कार झाल्याचे प्राथमिक तपासाणीत उघड झाले.
संशयित ताब्यात, गुन्ह्याची देखील कबुली
यानंतर पोलिसांनी सुत्रे गतीमान करत गावातील 48 वर्षीय संशयीताला ताब्यात घेतले. पोलिसांनी कसून चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबूली दिली. नागरिकांच्या संतापामुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे. त्यामुळे पोलिसांनी संशयीत आरोपीचे नाव गुप्त ठेवले आहे.
गृहराज्यमंत्री, पोलीस अधीक्षक घटनास्थळाकडे रवाना
पाटण विधानसभा मतदार संघात घडलेल्या या संतापजनक घटनेनंतर गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई ( Minister Shambhuraje Desai ) तसेच सातार्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल हे तातडीने घटनास्थळाकडे रवाना झाले आहे. तसेच पाटणचे प्रभारी पोलीस उपअधीक्षक डॉ. रणजित पाटील यांनी सकाळीच घटनास्थळ गाठून घटनेची माहिती घेतली. ते सध्या घटनास्थळीच ठाण मांडून आहेत.