सातारा - महाआघाडीचे उमेदवार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ 17 एप्रिल रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा होणार आहे. या सभेकडे सातारा जिल्ह्यासह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. सातारच्या सभेत राज ठाकरे काय बोलणार याबाबतही लोकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
उदयनराजे आणि राज ठाकरे हे दोन्ही नेते सोशल मीडियावर स्टार आहेत. उदयनराजे व राज ठाकरे यांच्या संबंधीची कोणतीही बातमी समाज माध्यमावर प्रसिद्ध झाल्यानंतर ती गुगल ट्रेडिंगमध्ये येते. लाखो वाचक एका क्षणात त्यांची बातमी वाचतात. त्यामुळे उदयनराजे व राज ठाकरे यांचे लोकप्रियता लक्षात येऊ शकते. उदयनराजे सातारा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून रिंगणात आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरेंनी आपल्या नेहमीच्या शैलीत महायुतीवर व पर्यायाने नरेंद्र मोदी यांच्यावर तोफ डागायला सुरुवात केली आहे.
17 एप्रिल रोजी साताऱ्यातील गांधी मैदानावर सायंकाळी साडेपाच वाजता राज यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. उदयनराजे व राज ठाकरे प्रथमच एका व्यासपीठावर येत असल्यामुळे, सातारा तसेच महाराष्ट्रातील लोकांचे लक्ष या सभेकडे लागलेले आहे. उदयनराजे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सातारा लोकसभा मतदारसंघात त्यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. वाई, पाटण, जावळी सारख्या दुर्गम भागात प्रचारासाठी फिरत आहेत, असे असताना राज ठाकरे यांची साताऱ्यात सभा निश्चितच वादळी ठरणार आहे. राज ठाकरे आपल्या नेहमीच्या शैलीत महायुतीवर तोप डागणार आणि उदयनराजे "एक बार जो मैंने कमिटमेंट कर दी", असे म्हणत कॉलर उडवणार, त्यामुळे 17 तारखेला साताऱ्यात होणाऱ्या सभेला तोबा गर्दी होणार एवढे मात्र निश्चित आहे.