सातारा - माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 2 जानेवारी 1960 ला महाराष्ट्र पोलीस दलाला ध्वज सुपूर्त केला होता. हा दिवस 'रेझिंग डे' म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्र पोलीस दल २ जानेवारी ते ८ जानेवारी २०२० दरम्यान रेझिंग डे साजरा करत आहेत. या पार्श्वभूमीवर पोलीस आणि समाज यांच्यातील नाते अधिक दृढ करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. सातारा पोलिसांनी देखील शस्त्र प्रदर्शन, सायबर गुन्ह्यांविषयी माहिती, विद्यार्थ्यांची पोलीस ठाण्याला भेट, या प्रकारचे कार्यक्रम राबवले आहेत.
मंगळवारी सर्व नागरिकांसाठी परेड खुली ठेवण्यात आली होती. त्यानंतर शस्त्रप्रदर्शन, वाहतूक नियम, पोलिसांकडून वापरल्या जाणाऱ्या उपकरणाविषयी, निर्भया पथकाच्या कामकाजाविषयी, पोलीस ठाण्याच्या कामकाजाविषयी, सायबर पोलीस ठाण्याविषयी, पोलीस मुख्यालयाविषयी विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.
हेही वाचा - आज भारत बंद! 25 कोटी कामगार जाणार संपावर..
यावेळी जांभ्या खडकाचा वापर करून बांधण्यात येणाऱ्या परेड किल्ल्याचे भूमिपूजनही करण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, सहायक पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्यासह सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचारी या कार्यक्रमाला उपस्थित होते.
पोलिसांबद्दल समज गैरसमज दूर होतील
समाजात पोलिसांविषयी अनेक समज-गैरसमज असतात. त्या पार्श्वभूमीवर साताऱ्यात पोलिसांचा रेझिंग डे आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून पोलिसांचे जनतेसोबत नाते दृढ करण्यास मदत होईल, अशी प्रतिक्रिया पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिली. या उपक्रमातून पोलीस आपले मित्र आहेत हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. पोलिसांच्या पाल्यांसह अन्य पाल्यांसाठी रिलायन्सने बॉक्सिंगसाठी साहित्य उपलब्ध करून दिले आहे. विशेष म्हणजे या खेळातील दोन मुलांची खेलो इंडियासाठी निवड झाली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.