सातारा - वखार व्यावसायिकाकडून 15 हजारांची लाच घेताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रहिमतपूर येथील कर्मचाऱ्याला लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. रस्त्याच्या कडेला वाढलेल्या झाडांची तोडणी नियमापेक्षा जास्त केल्याने हे प्रकरण दाबण्यासाठी संबंधित अधिकाऱ्याने वखार व्यवसायिकाकडून लाच मागितली होती. बाळू बाबुराव वाघ (वय ५४) असे आरोपीचे नाव आहे. तो सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रहिमतपूर विभागात मजूर म्हणून नोकरीस आहे.
महाबळेश्वर-विटा या रस्त्याचे काम सुरू असून त्यात अडथळा ठरणारी झाडं तोडण्याचा ठेका एका वखार व्यावसायिकाला देण्यात आला आहे. त्यानुसार संबंधित झाडे तोडत असताना त्याच्याकडून अटी व नियमांपेक्षा जास्त झाडांची तोड करण्यात आली होती. त्यावर कारवाई न करण्यासाठी तक्रारदाराला 15 हजारांची लाच मागितली होती.
तक्रारदाराने स्थानिक लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात तक्रार दिली. तक्रारीची पडताळणी करून पोलिसांनी रहिमतपूर येथे सोमवारी सायंकाळी सापळा लावला. त्यावेळी बाळू वाघ हा तडजोडी अंती 15 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात सापडला. याबाबत रहिमतपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक अशोक शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.