सातारा - कोरोना विषाणूच्या लढ्यात अहोरात्र मेहनत घेणाऱ्या पोलीस यंत्रणेच्या कामगिरीला अभिवादन करण्यासाठी शहरातील सर्व मुख्य रस्त्यांवर रांगोळी काढण्यात आली होती. घोषवाक्य, दुतर्फा उभ्या असलेल्या नागरिकांनी केलेली पुष्पवृष्टी व वाजविलेल्या टाळ्या अशा भारलेल्या वातावरणात दहिवडी पोलीसांचे शहरातून संचलन संपन्न झाले. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, उपविभागीय पोलीस अधिकारी बी. बी. महामुनी, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद दीक्षित आदी मान्यवर उपस्थित होते.
नागरिकांना कोरोना विषाणूच्या अनुशंगाने प्रबोधन व मार्गदर्शन संचलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी बोलताना श्रीमती सातपुते म्हणाल्या, की 'कोरोना विषाणूच्या विरोधात आपली लढाई सुरू आहे. या विषाणूचा संसर्ग व प्रादूर्भाव टाळण्यासाठी 'लॉकडाऊन' कालावधीमध्ये नागरिकांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. या विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी आपल्या कुटुंबासमवेत घरातच रहा. विनाकारण घराबाहेर पडू नका. सोशल डिस्टन्सिंग ठेवा'.
सदर संचलनादरम्यान श्रीमती सातपुते यांनी मार्डी चौक येथे कोरोना विषाणू संदर्भात नागरिकांनी घ्यावयाची काळजी आणि उपाययोजना याबद्दल सूचना केल्या. तसेच येथील नागरिक घेत असलेल्या काळजी बाबत व पोलिस प्रशासनाला करत असलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले.