सातारा - फडणवीस सरकारच्या काळात महाराष्ट्राचे प्रचंड नुकसान झाले आहे. औद्योगिक क्षेत्रामध्ये महाराष्ट्र राज्य पहिल्या क्रमांकावरून थेट तेराव्या क्रमांकावर फेकले गेले. कुठलाही मोठा प्रकल्प महाराष्ट्रात आला नाही. केवळ दबावासाठी राजकारण करून विरोधकांना नामोहरण करण्याचे काम भाजप सरकार करत आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, आमदार पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, की भाजपची केंद्रासह राज्यात सत्ता होती. तेव्हा विरोधकांना मोडण्याचे राजकारण करण्यात आले. ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांना नोटीस पाठवली. छगन भुजबळ यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला कुठलाही पुरावा नसताना पावणेदोन वर्षे डांबून ठेवले. 'ना खाऊंगा ना खाने दुंगा' असे म्हणणाऱ्यांनी विरोधकांना विनाकारण वेठीस धरून त्रास दिला. भाजपने कारवाई केलेल्या नेत्यांविरोधात न्यायालयात खटला का चालवला नाही, हेही स्पष्ट केलेले नाही.
हेही वाचा-प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीची कारवाई: 'केंद्रीय संस्थांचा राजकीय द्वेषासाठी गैरवापर'
कृषी अर्थव्यवस्था ठराविक लोकांच्या घशात घालण्याचा डाव-
मोदी सरकारच्या धोरणावरदेखील पृथ्वीराज चव्हाण यांनी सडकून टीका केली. ते म्हणाले, की दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी खासगी बँकांचे राष्ट्रीयीकरण केले. मोदींच्या काळात उलटा कारभार सुरू आहे. सरकारी मालमत्ता उद्योगपतींच्या घशात घालण्याचा कारभार सुरू केला आहे. विमानतळ व बंदरे ही खासगी उद्योगपतींना दिली गेली आहेत. तर कृषी अर्थव्यवस्था ठराविक लोकांच्या घशात घालण्याचा डाव खेळल्याने काँग्रेसने त्याला तीव्र विरोध केलेला आहे.
हेही वाचा-रावसाहेब दानवेंच्यातील 'ज्योतिषी' प्रतिभा मला आता समजली - शरद पवार
देशाचे विभाजन करण्याचा भाजपचा डाव-
केंद्रातील भाजप सरकार 'लव जिहाद'चा कायदा संपूर्ण देशात लागू करत असल्याच्या प्रश्नावर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, अशा पद्धतीने देशाचे विभाजन करण्याचा भाजपने डाव आखलेला आहे. देशातील समाजरचनाही धार्मिक आधारावर तयार करायचा घाट त्यांनी घातला आहे. धर्म हा घरात आहे. धर्माच्या आधारावर राजकारण करणाऱ्या प्रवृत्तीला काँग्रेसचा विरोध कायम राहील. दरम्यान, अभिनेता सुशांत सिंह याच्या गुढ मृत्यूची पारदर्शकपणे चौकशी व्हायला हवी, असे मतदेखील त्यांनी यावेळी व्यक्त केले.
पत्रकार परिषदेला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव उपस्थित होते.