कराड (सातारा) - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला उद्देशून केलेले भाषण थाळी-टाळी वाजवा, दिवे लावा या प्रकारातले होते, अशी उपरोधिक टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. कोरोनाविरोधातील लढाई कशी लढणार, हे मोदींनी सांगितलेच नाही, कामगारांच्या पोटापाण्याचे काय, याबद्दल ते काहीच बोलले नाहीत, असेही चव्हाण म्हणाले.
कोरोनासारख्या महामारीच्या संकटात मोदींच्या भाषणातून देशातील जनतेला कसलाही दिलासा मिळाला नाही. कोरोनाच्या दुसर्या लाटेने राज्यातील आणि देशातील आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. लसीचा तुटवडा जाणवत आहे, अशा परिस्थितीत कडक लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही, असे सांगत पृथ्वीराज चव्हाण यांनी लॉकडाऊनचे समर्थन केले. परदेशातून लस आयात करण्याच्या पर्यायावरही त्यांनी शंका उपस्थित केली. अन्य देश आपल्याला लस का देतील, असा सवाल करून पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, परदेशातून लस आयात केली, तरी आपल्या देशातील लोकांना ती लस चालेल का हे तपासण्यासाठी अनेक महिने जातील. त्यापेक्षा आपल्या देशात तयार होणार्या लसीला लागणारा कच्चा माल अमेरिकेसारख्या देशांनी देण्यासाठी तेथील भारतीयांनी अमेरिकन सरकारवर दबाव वाढवणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
देवेंद्र फडणवीस यांनी औषध कंपनीवर दबाव टाकून खासगी इंजेक्शनचा साठा विकत घेतला. देवेंद्र फडणवीस यांच्या नातेवाईकांनी आरोग्य यंत्रणेवर दबाव आणून नियमबाह्यपणे लस टोचून घेतली असून या सर्वांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी देखील पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.