सातारा - पक्षाने संधी दिली आणि जनतेने निवडून दिल्यामुळे पक्ष आणि जनता माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत. सध्या पक्ष अडचणीत आहे. या काळात पक्षाला माझी गरज आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठींचा आदेश आणि कराड दक्षिणेतील जनतेची भावना या दोन्ही गोष्टीचा विचार करून कराड दक्षिण विधानसभा की सातारा लोकसभा पोटनिवडणूक लढायची, याबाबतचा निर्णय 2 दिवसात घेतला जाईल, असे वक्तव्य माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
हेही वाचा - गांधीजयंतीला काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महाआघाडीची घोषणा
चव्हाण पुढे म्हणाले, की कराड दक्षिणच्या जनतेचे उपकार मी कधीही विसरू शकणार नाही. जनतेच्या आशीर्वादामुळेच आज मी मोठा झालो आहे. जनतेने मला संधी दिली आणि मी जनतेला दिलेला शब्द आजपर्यंत पाळला. प्रत्येक गावांमध्ये निधीच्या माध्यमातून विकास घडवला आहे. निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीच्या नेत्यांवर ईडीची कारवाई झाली आहे. 25 हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप त्यांच्यावर झाला आहे. मुख्यमंत्री साम-दाम-दंड-भेद वापरून आणि प्रसंगी ईडी व सीबीआयची भीती घालून विरोधी पक्षातील नेत्यांचे भाजप प्रवेश करून घेत असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला.
हेही वाचा - काँग्रेसची ५१ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
एखादा गुन्हा दाखल करून मलाही जेलमध्ये टाकले तर आश्चर्य वाटायचे कारण नाही. तशी मानसिकताही मी तयार केली आहे, असा उपरोधिक टोला चव्हाण यांनी मारला. यावेळी माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक, कृष्णा कारखान्याचे माजी चेअरमन इंद्रजित मोहिते, युवक काँग्रेसचे सरचिटणीस शिवराज मोरे, जिल्हा परिषद सदस्य जयवंत जगताप, निवास थोरात, विद्या थोरवडे, अजित पाटील-चिखलीकर, मलकापूरच्या नगराध्यक्षा नीलम येडगे, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, पंचायत समिती सदस्य, नामदेव पाटील, नगरसेवक इंद्रजित गुजर, राजेंद्र यादव, झाकीर पठाण यांच्यासह प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.