कराड (सातारा) - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर प्रदेश काँग्रेसच्या शिस्तपालन समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे, तर माजी मंत्री दिवंगत विलासकाका उंडाळकराचे सुपुत्र अॅड. उदयसिंह पाटील यांची प्रदेश काँग्रेसच्या जनरल सेक्रेटरीपदी निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निवडी जाहीर झाल्या आहेत. त्यामध्ये सातार्यातील पाच जणांना संधी मिळाली आहे.
सातारा जिल्ह्यातील पाच जणांना संधी
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे जनरल सेक्रेटरी के. सी. वेणुगोपाल यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यकारिणीच्या निवडी गुरूवारी रात्री जाहीर केल्या आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची शिस्तपालन समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांची प्रदेश काँग्रेसच्या जनरल सेक्रेटरीपदी निवड करण्यात आली आहे. काँग्रेस पक्षात सक्रिय होताना युवक काँग्रेसचे सरचिटणीस पद देण्यात आले होते. प्रदेश काँग्रेसमध्ये संधी देऊन काँग्रेसने अॅड. उदयसिंह पाटील यांना महाराष्ट्राच्या राजकारणात काम करण्याची संधी दिली आहे. त्याचबरोबर राजेंद्र शेलार, रणजितसिंह देशमुख यांची प्रदेश सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे. कराड उत्तरमधील अजित पाटील-चिखलीकर यांचीही प्रदेश कार्यकारी समितीवर निवड झाली आहे.
उंडाळकर पुत्र राज्याच्या राजकारणात सक्रिय
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आणि कराड दक्षिणचे सलग 35 वर्षे आमदार राहिलेले दिवंगत विलासकाका पाटील-उंडाळकर यांच्या योगदानाची देखील काँग्रेसने दखल घेतली आहे. त्यांचे सुपुत्र अॅड. उदयसिंह पाटील यांना जनरल सेक्रेटरीपदावर काम करण्याची संधी देऊन महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय केले आहे.
चव्हाण-उंडाळकरांच्या निवडीने काँग्रेसमध्ये उत्साह
माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांची शिस्तपालन समितीच्या अध्यक्षपदी आणि अॅड. उदयसिंह पाटील यांची जनरल सेक्रेटरीपदावर झालेली निवड सातारा जिल्हा काँग्रेसमध्ये उत्साह संचारणारी आहे. चव्हाण-उंडाळकर गटाची झालेली एकी आणि काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर दाखविलेला विश्वास काँग्रेस कार्यकर्त्यांना सुखावणारा आहे. त्याचबरोबर अजित पाटील-चिखलीकर, रणजितसिंह देशमुख, राजेंद्र शेलार यांनाही प्रदेश पातळीवर संधी मिळाल्याने सातारा जिल्हा काँग्रेसमध्ये चैतन्याचे वातावरण आहे.