सातारा - काँग्रेसचे उमेदवार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि भाजपचे उमेदवार अतुल भोसले हे गुरुवारी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अर्ज दाखल केल्यानंतर दोघांच्याही जाहीर सभा होणार आहेत.
हेही वाचा - साताऱ्यातील माण-खटाव मतदारसंघात युतीत बिघाडी
पृथ्वीराज चव्हाण गुरुवारी सकाळी 11 वाजता आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. यावेळी सातारा लोकसभा पोटनिवडणुकीतील काँग्रेस आघाडीचे अधिकृत उमेदवार, सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आघाडीचे उमेदवार आमदार बाळासाहेब पाटील, भारती विद्यापीठाचे उपाध्यक्ष डॉ. इंद्रजीत मोहिते यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
अर्ज दाखल केल्यानंतर चव्हाण व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत दुपारी 3 वाजता दत्त चौकातून विजयी संकल्प रॅलीस प्रारंभ होईल. दत्त चौक येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर रॅली मुख्य बाजारपेठमार्गे आझाद चौक, चावडी चौक, कन्या शाळा, जोतिबा मंदीर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा मार्गे कराड नगरपालिकेजवळ पोहचल्यानंतर जाहीर सभा होणार आहे.
हेही वाचा - उदयनराजेंनी लोकसभेचा तर शिवेंद्रराजेंनी विधानसभेसाठी भरला अर्ज
तर भाजपचे उमेदवार अतुल भोसले यांनीही जोरदार शक्तीप्रदर्शनाची तयारी केली आहे. तसेच जाहीर सभेचीही जय्यत तयारी केली आहे. त्यामुळे काँग्रेस आणि भाजपच्या या दोन्ही उमेदवारांच्या शक्तीप्रदर्शनाकडे आणि जाहीर सभांकडे कराड दक्षिणसह सातारा जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे.
हेही वाचा - 'काँग्रेसच्या आरोपांमुळेच भाजपने भ्रष्ट मंत्र्यांची तिकिटे कापली'