सातारा - महाराष्ट्रातील गड किल्ले हे इथल्या मातीच्या संघर्षाची आणि इतिहासाची साक्ष देतात. मात्र, काळाच्या ओघात या किल्ल्यांची पडझड होऊ लागली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या प्रतापगडावर अफझल खानाचा कोथळा बाहेर काढला, त्या गडाच्या संवर्धनाची मोहीम सह्याद्री प्रतिष्ठानच्या दुर्गसेवकांनी फत्ते केली आहे. गेल्या वर्षी झालेल्या पावसात गडाच्या तटबंदी बुरुजाखालील भाग ढासळला होता. मात्र, सह्याद्री प्रतिष्ठानच्या मावळ्यांनी शिवभक्तांच्या सहकार्याने ती तटबंदी आता अधिक भक्कम केली आहे.
प्रतापगडाच्या तटबंदी संवर्धनाची मोहीम केवळ ९४ दिवसांत फत्ते करण्यात आली. हे काम पूर्ण झाल्याची घोषणा मंगळवारी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली. सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक श्रमिक गोजमगुंडे यांनी याबाबतची माहिती दिली. यावेळी खासदार उदयनराजे यांच्यासह श्रमिक गोजमगुंडे, दीपक प्रभावळकर, अभयराजे शिरोळे, अमितराजे राजेशिर्के आणि दुर्गसेवक उपस्थित होते.
गेल्या वर्षी जून महिन्याच्या सुरुवातीलाच झालेल्या मुसळधार पावसाने प्रतापगडाच्या तटबंदीच्या बुरुजाखालील भागाचे भुस्खलन झाले. त्यामुळे तटबंदीच्या बुरुजाला धोका निर्माण झाला होता. याबाबतची माहिती तमाम शिवभक्तांपर्यंत वाऱ्यासारखी पोहोचली. त्यानंतर दुर्गसंवर्धनाचा वसा घेतलेल्या सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक श्रमिक गोजमगुंडे हे शिवभक्तांसह गडावर पोहचले अन् त्यांनी ही तटबंदी पुन्हा भक्कम करण्याचे निश्चित केले आणि या मोहिमेच्या कामाला सुरुवात केली.
पुरातत्व विभागाची परवानगी आणि बांधकामाला सुरुवात-
राज्यातील गडकिल्ले पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत येतात. त्यामुळे सह्याद्री प्रतिष्ठानने सुरुवातीला पुरातत्व विभागाचे सहायक संचालक विलास व्हाळे आणि महाराष्ट्राचे डॉ. तेजसगर्दे यांची परवानगी घेतली. त्यानंतर वनविभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर यांचीही परवानगी मिळवली या रुपरेखा आखून कार्यारंभ केला.
गडाच्या दुरुस्तीसाठी प्रत्यक्ष कामाचे डिझाईन तयार झाल्यानंतर २७ जानेवारी २०२१ ला स्थानिकांच्या हस्ते कामाचे भूमिपूजन करण्यात आले. अत्याधुनिक यंत्रणा वापरून हे काम सुरू करण्यात आले. त्यामध्ये शॉटक्रिट फवारणी तंत्रज्ञान, ड्रिलींग, बोलटिंग ग्राऊटींग, तटबंदीच्या पायावर वजन न वाढवता, जिओ फोम, जिओ नेट, वायर रोप, बेअरिंग प्लेटचा वापर करण्यात आला. लोखंडी तारांची जाळी, तराई काम करण्यात आले. अन् अखेर १ मे २०२१ ला प्रतापगड तटबंदीच्या संवर्धनाचे काम पूर्ण झाले, असल्याची माहिती गोजमगुंडे यांनी दिली.
राजगड संवर्धन मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन
येत्या दिनांक २९ आणि ३० मे रोजी राजगडची पावसाळ्यापूर्वीची शेवटची मोहीम आयोजित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या नंतर पावसाळा संपेपर्यंत पुढील ३ ते ४ महिने राजगड संवर्धन मोहिमा बंद ठेवण्यात येतील. त्यामुळे यंदाच्या या शेवटच्या मोहिमेत कोणाला सहभागी व्हायचे असल्यास त्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.