सातारा - कोरोनामुक्त असलेल्या म्हसवड शहरात चौथ्या टप्प्याच्या शेवटी कोरोनाने शिरकाव केला आहे. यामुळे, म्हसवडकरांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. अशात शहरांमधून मोठ्या प्रमाणात लोक गावांकडे येत असून हे लोक सर्रासपणे बाहेर फिरत आहेत. परिणामी कोरोनाची साखळी अधिक घट्ट होत आहे. याच कारणामुळे प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे यांनी लॉकडाऊनचा नियम मोडणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
मुंबई पुण्यावरुन आलेले लोक कोणतीही काळजी न घेता सर्वत्र फिरत आहेत. यासंबंधी म्हसवडकरांनी प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांच्याकडे तक्रार केली. यानंतर लॉकडाऊनचा नियम मोडणारे, सोशल डिस्टन्सचे उल्लंघन करणारे तसेच मास्कचा वापर न करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे व तहसीलदार बाई माने यांनी दिले आहेत. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना दंड ठोठावण्यासही त्यांनी म्हसवड पोलीस स्टेशनचे सपोनि गणेश वाघमोडे, पालिका कर्मचारी सागर सरतापे , तलाठी उत्तम आखडमल व आरोग्य विभागाचे अधिकारी लक्ष्मण कोडलकर यांना सांगितले आहे.