सातारा Prakash Ambedkar On PM Modi : 'इंडिया'मध्ये दुफळी असून त्याचा फायदा पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ) घेतील, असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी साताऱ्यातील पत्रकार परिषदेत बोलताना केलं आहे. तसेच दिवाळीपूर्वी अटकसत्र सुरु होणार असून, ते निवडणुकीपर्यंत राहिल, असं भाकितही प्रकाश आंबेडकर यांनी वर्तवलं आहे. गोध्रा, मणिपूरसारख्या दंगल घडण्याची शक्यता देखील त्यांनी वर्तवल्यानं खळबळ उडाली आहे. 'इंडिया' आघाडीत वंचितला न घेतल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी 'इंडिया' आघाडीला संपवून टाकतील, असा दावाही प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केला.
हिटलरनं केलं ते पंतप्रधान मोदी करतील : 2024 ची लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी नरेंद्र मोदी हे हिटलरनं जे केलं तेच करणार आहेत, असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला. जो विरोधात जाईल, त्याचा आवाज दाबला जाईल. सध्या राज्यातील विविध भागात मुस्लिम घरात हिंदू मुलगी, हिंदू घरात मुस्लिम मुलगी आहे का, याचा शोध राष्ट्रीय स्वयंसेवक संघ घेत असल्याचा आरोपही प्रकाश आंबेडकर यांनी केला. प्रेम विवाह न राहता ते आता धार्मिक विवाह झाले आहेत. लोकांची डोकी भडकवण्याची राजकीय खेळी सुरु आहेत, असा हल्लाबोलही प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
इंडिया आघाडी शेवटपर्यंत टिकावी : 'इंडिया' आघाडी शेवटपर्यंत टिकावी, अशी अपेक्षा प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी वर्तवली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि आमच्यावर कोणतीही चौकशी नाही. त्यामुळे आम्ही बेधडक भूमिका घेत आहोत. 'इंडिया'च्या बैठकीत खासदार राहूल गांधी यांनी अदाणीमुळे अर्थव्यवस्था धोक्यात असल्याची भूमिका मांडली. त्या भूमिकेबरोबर राष्ट्रवादी आहे, असं दिसत नाही. यासंदर्भात अधिकृत भूमिका न घेतल्यास त्याचा मोठा फायदा नरेंद्र मोदी घेतील. 'इंडिया'नं 'वंचित'ला बरोबर घेतलं नाही, तर मोदी 'इंडिया'ला संपवतील, असंही प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं आहे.
मंत्रिपदंही कंत्राटी पद्धतीनं भरा : राज्यात खासगीकरण सुरू झालं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यासारखी पदंही कंत्राटी पद्धतीनं भरावीत, असा टोला प्रकाश आंबेडकरांनी लगावला. बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी शासनाकडं योजना नाहीत. कंत्राटी कर्मचारी भरले आहेत. लोकसभा आणि विधानसभेत 'वंचित'ला सत्ता मिळाल्यास कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम केलं जाईल, असं सांगून ग्रामसेवक पदभरतीत टीसीआय कंपनीनं 120 कोटींचा नफा कमावल्याचा खळबळजनक आरोप प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केला आहे.
सनातनविरोधात मोठी लाट : सनातन धर्माविरोधात समाजामध्ये मोठी लाट आहे, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला. महाराष्ट्रातील सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर भागात ब्राह्मणविरोधी मोहिम सुरु झाली होती, असा दावाही प्रकाश आंबेडकर यांनी केला. सनातन धर्मात शुद्रता, अतिशुद्रता का आहे, हे जाहीर करावं. हिंदू धर्मातील वारकरी संप्रदाय सनातनविरोधात असल्याचंही प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले.
हेही वाचा :