सातारा - फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर अशोक दळवी (वय 33) याला 4 लाख रूपयाची लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले आहे. फलटण तालुक्यात एकाच महिन्यात दोन मोठ्या अधिकाऱ्यांवर झालेल्या कारवाईमुळे फलटण तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
हेही वाचा -पतीच्या जाचाला कंटाळून नवविवाहितेची आत्महत्या; पळून जाऊन केला होता आंतरजातीय विवाह
याबाबत सविस्तर माहित अशी, की या प्रकरणातील तक्रारदाराच्या मामाच्या मुलास आरोपी न करण्याकरता तक्रारदाराकडे ज्ञानेश्वर दळवी याने 20 लाख रुपये रक्कमेची मागणी केली होती. या रकमेचा पहिला हप्ता म्हणून 4 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्या बाबतची तक्रार 17 फ्रेबुवारीला दिली होती. तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनुसार पडताळणी कारवाईमध्ये ज्ञानेश्वर अशोक दळवी याने 20 लाख रुपये रक्कम लाच मागणी करुन त्या लाच रक्कमेतील एक हप्ता 4 लाख रुपये मागितल्याचे निष्पन्न झाले. ज्ञानेश्वर दळवी याने लाच स्वीकारल्यानंतर रंगेहाथ पकडण्यात आले. एसीबीकडून त्याच्यावर रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.