सातारा: खटाव तालुक्यातील वाकळवाडी गावात हरभरा, कांद्याच्या पिकात लागवड केलेली ७५ किलो अफू वडूज पोलिसांनी छापा टाकून जप्त केली. याप्रकरणी शांताराम रामचंद्र म्होप्रेकर, चंद्रप्रभा शिवाजी म्होप्रेकर आणि विमल म्होप्रेकर (रा. वाकळवाडी, ता. खटाव) यांच्यावर वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एक एकरात अफूची लागवड: म्होप्रेकर यांनी एक एकर क्षेत्रावर गहू, हरभरा आणि कांद्याचे पीक घेतले आहे. या पिकांमध्ये संशयितांनी अफूची लागवड केली असल्याची माहिती वडूजचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मालोजीराजे भोसले यांना मिळाली. खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी छापा टाकला असता ७५ किलो अफू आढळून आली.
दीड लाखाची अफू जप्त: पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात आढळून आलेली सुमारे १ लाख ५२ हजार ७०० रूपये किंमतीची अफू जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी औषधी द्रव्य व मन प्रभावी पदार्थ अधिनियम कलमानुसार वडूज पोलीस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वडूज पोलिसांची कारवाई: गहू, हरभरा आणि कांदा पिकाच्या आडून अफूची लागवड करण्यात आली होती. मात्र, खबऱ्याच्या माहितीवरून वडूज पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक मालोजीराजे भोसले, हवालदार दादा देवकुळे, संदीप शेडगे, दऱ्याबा नरळे, दीपक देवकर, प्रशांत हांगे, सागर बडदे, वृषाली काटकर, मेघा जगताप यांनी ही कारवाई केली. पोलीस उपनिरीक्षक शीतल पालेकर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला असून मालोजीराव देशमुख तपास करत आहेत.
एक कोटीचा गांजा जप्त: पाच दिवसांपूर्वीच सातारा स्थानिक गुन्हे शाखा आणि म्हसवड पोलिसांनी माण तालुक्यातील लोणार खडकी गावात छापा टाकून डाळींबाच्या शेतातून तब्बल १ कोटी ५ लाख ५ हजार रुपये किंमतीची गांजाची झाडे जप्त केली होती. याप्रकरणी कुंडलिक निवृत्ती खांडेकर (रा. लोणार खडकी, ता माण) याला अटक करण्यात आली आहे. अंमली पदार्थ विरोधी सातारा जिल्ह्यात करण्यात आलेली आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई ठरली.