कराड (सातारा) - कराड तालुक्यातील मसूर येथे सुरू असलेल्या वाळू उपशाच्या ठिकाणी छापा मारून वाळूसह जेसीबी व इतर वाहनांसह सुमारे 40 लाख 51 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी उंब्रज पोलीस ठाण्यात चौघांवर दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ओढ्यातून बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱ्या आणि चोरट्या वाळूची वाहतूक करणाऱ्या वाळू माफियांविरुद्ध उंब्रज पोलिसांनी धडक कारवाई केली.
तुषार यादव, अमित चंद्रकांत पारवे (रा. मसूर, ता. कराड), आकाश अधिक चव्हाण (रा. चिखली, ता. कराड), विनोद कांबिरे (रा. कांबिरवाडी, ता. कराड), अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. मसूर येथील ओढ्यातून बेकायदेशीर वाळू उपसा होत असल्याची माहिती उंब्रज पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांना मिळाली. त्या आधारे पोलिसांनी गुरूवारी मध्यरात्री छापा मारला. त्यावेळी ओढ्याच्या पात्रात तीन ब्रास वाळू भरलेला डंपर (एमएच 50 एन 5049), वाळू उत्खनन करीत असलेला एक जेसीबी (एमएच 50 सी 2485) आढळून आला.
तुषार यादव, अमित पारवे हे दोघे जण अवैध वाळू उपसा करताना सापडले. उपसा केलेली वाळू आणि वाहने, असा 40 लाख 51 हजार 500 रूपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. संशयिताविरोधात शासकीय परवान्याशिवाय वाळू चोरल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास सहायक फौजदार सतीश मयेकर करीत आहेत. दरम्यान, दुसऱ्या पथकाने मध्यरात्री दोनच्या सुमारास मसूर गावच्या हद्दीत मसूर ते चिखली रस्त्यावरील शिवाजी हायस्कूलसमोर विनोद कांबिरे व आकाश चव्हाण यांना ट्रॅक्टर ट्रॉलीतून वाळूची वाहतूक करताना पकडले. त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.