सातारा - अपघात झाल्यानंतर पळून जाणाऱ्या विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या गाडीवरील चालकाला अखेर सातारा पोलिसांनी अटक केली आहे. सातारा महामार्गावर झालेल्या या अपघातात वृद्ध दत्तात्रय शेवते यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी चालक संजय दत्तात्रय जरग (वय ४८ रा. फुलेवाडी जि. कोल्हापूर) याला सातारा पोलिसांनी अटक केली आहे.
अपघातावेळी त्या वाहनांमध्ये मुंबई येथील नागरी संरक्षण हक्क विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक कैसर खालिद हे असल्याचे स्पष्ट झाले आहे. याबद्दल अधिक माहिती अशी की, शुक्रवारी कोल्हापूरहून पुण्याकडे निघालेल्या इनोवा कारची दत्तात्रय शिवराम शिवते (रा.भुईंज) यांना धडक बसली. यामध्ये शिवते मृत्यूमुखी पडले. अपघातानंतर वाहनचालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, नागरिकांनी पाठलाग करून आनेवाडी टोल नाक्यावर वाहन अडवले. या घटनेचे गांभीर्य ओळखून वाहन चालकाने हे वाहन भुईंज पोलिस ठाण्यात नेले.
पोलिसांनी कारवाई न करता १५ मिनिटांत वाहन सोडून दिले होते. या सर्व प्रकारामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात होती. आता पोलिसांनी गुन्हा दाखल करून वाहन चालक संजय जरग याला अटक केली आहे.
कैसर खालिद कोण आहेत..?
विशेष पोलीस महानिरीक्षक कैसर खालीद हे १९९७ बॅच आयपीएस अधिकारी आहेत. मूळचे बिहार राज्यातील व सध्या मुंबई येथे मानवी हक्क संरक्षण विभागात ते कार्यरत आहेत.