कराड (सातारा)- शुक्रवारी साजर्या होणार्या शिवजयंतीचे औचित्य साधत अभिनेते सयाजी शिंदे यांच्या उपस्थितीत सदाशिवगडावर १०१ वृक्षांची लागवड करण्यात आली. तसेच गडाच्या पायरी मार्गापासून वृक्षदिंडीही काढण्यात आली. यावेळी वडाच्या नावानं चांगभलं, पिंपळाच्या नावानं चांगभलं, येऊन येऊन येणार कोण..झाडाशिवाय हायचं कोण', अशा जयघोषाने सदाशिवगड दुमदुमून गेला.
ऑक्सिजन देणारे वृक्ष हेच सेलिब्रिटी -
ऑक्सिजन देणारे वृक्ष हेच मोठे सेलिब्रिटी असतात. त्यांना जात-पात नसते. गडकोटांवर वृक्ष लागवड आणि त्याचे संवर्धन हीच छ.शिवाजी महाराजांना खरी मानवंदना ठरेल, असे सयाजी शिंदे म्हणाले. सदाशिवगडावर लागवड करण्यात आलेले १०१ वृक्ष शिंदे यांच्याकडून सदाशिवगड मावळा प्रतिष्ठानसह दुर्गप्रेमी नागरिकांना दत्तक देण्यात आले. गडावर पाईपलाईनद्वारे पाण्याची सोय आणि दुर्ग संवर्धनाचे कार्य करणार्या सदाशिवगड मावळा प्रतिष्ठानचे शिंदेंनी कौतुक केले. तसेच सदाशिवगडावरील कार्य राज्यासाठी प्रेरणादायी आहे, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.
हेही वाचा - प्रेमाच्या नुसत्या आणाभाका नकोत; सिल्लोडमधील यशस्वी युगुलाची कथा
यावेळी दुर्गप्रेमी सलीम मुजावर, विठ्ठल महाराज स्वामी, नगरसेवक सौरभ पाटील, दीपकशेठ अरबुणे, सदाशिवगड मावळा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. योगेश कुंभार यांच्यासह शिवराय ट्रेकिंग ग्रुपचे सदस्य, दुर्गप्रेमींसह दुर्गसेवक उपस्थित होते.