सातारा - कर्जत-जामखेड मतदारसंघातून विजयी झालेले आमदार रोहित पवार स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीला अभिवादन करण्यासाठी कराडला आले होते. यंदाच्या महापुरावेळी तांबवे गावच्या पूरग्रस्तांना त्यांनी बारामती ॲग्रोच्या माध्यमातून भरीव मदत केली होती. त्याबद्दल तांबवे ग्रामस्थांनी त्यांची भेट घेवून कृतज्ञता व्यक्त केली आहे.
यंदा पश्चिम महाराष्ट्रातील कोयना आणि कृष्णाकाठाला पुराचा जबर तडाखा बसला. अनेक गावात आणि शहरांमध्ये पुराचे पाणी शिरले होते. हजारो लोकांना स्थलांतरीत करावे लागले. लोकांची निवार्याची आणि अन्न-पाण्याची मोठी आबाळ झाली. अशा संकटावेळी रोहित पवार हे पूरग्रस्तांच्या मदतीला धावून आले होते. त्यांनी पुराचा फटका बसलेल्या गावांमध्ये जाऊन बारामती अॅग्रोच्या माध्यमातून मदत केली होती. कराड तालुक्यात तांबवे गावाला पुराचा सर्वाधिक फटका बसला होता. अशावेळी अनेक सामाजिक संस्था, संघटनांनी माणुसकीचे दर्शन घडवत तांबवे पूरग्रस्तांना मदत केली. त्यात रोहित पवार यांच्या मदतीचादेखील वाटा मोठा होता.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सुध्दा पुराच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी तांबवे गावात आले होते.
हेही वाचा - गोविंदबागेत राजकीय खलबतं, बाळासाहेब थोरात पवारांच्या भेटीला
कर्जत-जामखेड मतदार संघातून रोहित पवार निवडून आल्याबद्दल तांबवे ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदनही केले. यावेळी सरपंच जावेद मुल्ला, उपसरपंच धनंजय ताटे, सह्याद्री कारखान्याचे माजी संचालक निवासराव पाटील, शंकर पाटील, प्रा. एस. बी. पाटील, दत्तात्रय भोसले, रामचंद्र पवार, सागर पाटील, सुदर्शन पाटील, पृथ्वीराज पाटील, अक्षय पाटील आदी उपस्थित होते.