सातारा - म्हसवड येथे लॉकडाऊन सुरू असताना मुख्य पेठेतील काही व्यापारी सोशल डिस्टन्सिंगचा आदेश जाणीवपूर्वक न पाळता व्यवहार करत असून पोलिसांच्या दुर्लक्षामुळे मुख्य पेठेत चारचाकी वाहने बिनधास्तपणे ये-जा सुरू असल्याने वाहतूक कोंडी होत असल्याने संचारबंदीला हरताळ फासला जात आहे तरी याकडे जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस प्रमुखांनी लक्ष देऊन कोरोनाच्या संभाव्य धोक्यापासून शहरातील सुमारे २५ हजार लोकसंख्येचे जीव वाचवावेत, अशी मागणी शहरवासीयांतून केली जात आहे.
देशाचे पंतप्रधान, राज्याचे मुख्यमंत्री व जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कोरोनापासून लोकांचे जीव वाचवण्यासाठी अहोरात्र काम करून करोनापासून लोकांना वाचवण्यासाठी पोटतिडकीने आवाहन करत असताना मात्र काही दुकानदारांच्या आणि लोकांच्या चुकीमुळे मात्र लॉकडाऊनला हरताळ फासल्याचे आज म्हसवड बाजारपेठेत दिसून आले काही दुकानदार सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत नाहीत. मुख्य रस्त्यावर चारचाकी वाहने लावण्यात आल्याने वाहतुकीची कोंडी मोठ्याप्रमाणात होऊन वाहनकोंडी होऊन पेठेत गर्दी होत असल्याने याकडेही पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे.
पोलिसांना, व्यापाऱ्यांना वरिष्ठांच्या आदेशाचे सोयरसुतक असाच प्रकार आज सकाळी म्हसवडमध्ये दिसून आला आहे. यामुळे स्थानिक पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाने दिलेल्या लॉकडाऊनच्या काळात आदेशाची दिवसाढवळ्या पायमल्ली सुरू असल्याने जे पदाधिकारी पुढे होऊन शहरातील नागरिकांची आरोग्याची सुरक्षिततेसाठी झटत आहेत त्याच्यात नाराजी पसरली असून जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस प्रमुखांनी तातडीने याकडे गांभीर्याने पाहून शहराला भेट देऊन येथील काही जणांमुळे सुरू असलेला लॉकडाऊनचा फज्जा करणारांची कानउघाडणी करणार का? याकडे म्हसवडकरांच्या नजरा लागल्या आहेत.
कोरोनाचे बळी वाढू नयेत यासाठी सामाजिक विलगीकरण, घरात थांबून इतरांना मदत करणे, स्वत:चा बचाव करणे याला प्राधान्य द्यायला हवे आहे. २१ दिवस हे तंतोतंत पाळले की, विषाणुंचा प्रादुर्भाव होण्याची साखळी निश्चित तुटेल यासाठी सर्वांनी पालन व्यवस्थित केले, पण आज नेमके काय झाले की सकाळी मुख्य पेठेत गदीँ उसळली? कालच देशाचे पंतप्रधानांनी ३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्याचे पालन नागरिकांनी करणे गरजेचे असताना येथील काही जणांच्या चुकीमुळे हरताळ फासला जात असून यामुळे कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होऊ शकतो, तरी संबंधित यंत्रणेने दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी भाजीमंडई शहरात भरवण्यात येऊ नये असे आदेश असतानाही शहरात चांदणी चौक, रिंगावणपेठ, शिंगणापूर चौक या तीन ठिकाणी भाजीमंडई कोणाच्या आशीर्वादाने भरवण्यात येत असून कोणत्याही प्रकारचे सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नाही. पालिकेने याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. आज बुधवार आठवडी बाजाराचा दिवस असल्याने शहरात आज पहिल्यासारखाच बाजार भरला की काय, असा प्रश्न गर्दी पाहिल्यावर पडल्याशिवाय राहत नाही.
शहरातील गल्लीबोळं नागरिकांनी बंद केली आहेत. बसस्थानक परिसरातून शहरात येणारा मुख्य रस्ताही वाहतुकीसाठी बंद केला. पण रामोशी वेशीतून रिंगावण पेठ हा रस्ता वाहतुकीसाठी सुरुच ठेवल्याने मुख्य पेठेत वर्दळ व वाहतूककोंडी वाढली आहे. याही रस्त्यावर बॅरिकेड्स लावून वाहतुकीस बंद करुन अत्यावश्यक सेवेसाठीच हा रस्ता सुरू ठेवण्याची मागणी होत आहे. गल्लीबोळातील रस्ते बंद केले पण इतर वर्दळीचे रस्ते सुरू ठेवल्याने मोरीला बोळा आणि दरवाजा उघडाच असाच काहीसा प्रकार सुरू असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.