सातारा - रस्त्यातील खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात मेढा-पलूस ही एसटी पलटी होऊन एकजण ठार आणि तीन जण गंभीर झाले आहेत. या अपघातात 40 प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहेत. कराड-तासगाव मार्गावर वडगाव हवेली गावच्या हद्दीत शुक्रवारी दुपारी 4 वाजता हा अपघात झाला.
हेही वाचा - झारखंड विधानसभेचं बिगूल वाजलं, ३० नोव्हेंबरला मतदान, तर २३ डिसेंबरला मतमोजणी
श्रीरंग बाळकृष्ण माने (वय 40, रा. खुबी, ता. कराड) असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव असून अन्य दोन महिला आणि एक पुरुष गंभीर जखमी झाले आहेत. मेढ्याहून पलूसकडे निघालेली एस. टी. (क्र. एम. एच. 40 एन. 9279) वडगाव हवेली गावच्या हद्दीतील दत्त पेट्रोल पंपाजवळ आल्यानंतर रस्त्याकडेच्या शेतात जाऊन पलटी झाली. खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाल्याचे घटनास्थळावरील नागरिकांनी सांगितले आहे. अपघातानंतर नागरिकांनी एसटीमधील प्रवाशांना बाहेर काढले. त्यानंतर श्रीरंग माने हे काही अंतर चालत आले आणि खाली कोसळले. माने व अन्य गंभीर जखमींना उपचारासाठी रूग्णालयात नेण्यात आले. परंतु, माने यांचा वाटेतच मृत्यू झाला होता. इतर तीन जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कराड-तासगाव मार्गाच्या रूंदीकरण आणि मजबुतीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यमार्गावर खड्ड्यांचे आणि धुळीचे साम्राज्य आहे. खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात या मार्गावर रोज लहान-मोठ्या अपघाताच्या घटना घडत आहेत. या अपघातामुळे नागरिकांनी ठेकेदाराच्या हलगर्जीपणाबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे.