सातारा - जिल्ह्यातील नागठाणे येथे एकाने लग्न होत नसल्याच्या नैराश्यातून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. योगेश सूर्याजी मगर (वय ४४) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
दुकानातच संपवले जीवन
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश मगर हा त्याच्या आईसोबत नागठाणे येथे राहत होता. गावातच मेन रोडवर एक दुकान भाड्याने घेऊन तो टेलरिंग व्यवसाय करत असे. झोपण्यासाठी तो नेहमी रात्री दुकानात जात होता. लग्न ठरत नसल्याने काही काळापासून तो नैराश्याने ग्रासला होता.
या नैराश्यामुळे त्याला दारूचे व्यसन लागले होते. दिवसभर योगेश घरी न आल्याने त्याची आई त्याला शोधण्यासाठी रात्री उशिरा दुकानात गेली. दुकानाचे शटर उघडून बघितले असता योगेश मगर याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. याबाबतची फिर्याद चंद्रकांत रघुनाथ साळुंखे यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात दिली आहे. पोलीस शिपाई बाबा महाडिक अधिक तपास करत आहेत.