सातारा - अजिंक्यतारा किल्ल्यावर सोनगावच्या बाजूस वणवा लावल्याबद्दल एका तरुणाला न्यायालयाने ६ हजार रुपये दंडाची आणि न्यायालयाचे कामकाज संपेपर्यंत बसण्याची शिक्षा दिली. संदीप रामचंद्र जाधव (वय २२, रा. सोनगाव ता. जि. सातारा) असे आरोपीचे नाव आहे.
शनिवारी (२४एप्रिल) अजिंक्यतारा किल्ल्याच्या दक्षिणबाजूला, सोनगाव वनक्षेत्रात दुपारी वणवा लागल्याचे लक्षात आले. वनपाल योगेश गावित योगेश आणि त्यांच्या पथकाने तत्काळ हा वणवा विझवण्याचा प्रयत्न केला. वणवा विझवताना वन विभागाच्या पथकाला काही अंतरावर हालचाल दिसून आली. त्या दिशेने शोध घेतल्यानंतर संदीप जाधव या तरुणाला ताब्यात घेण्यात आले. अधिक चौकशीत त्याने वणवा लावल्याची कबुली दिली.
ही कारवाई वनक्षेत्रपाल शितल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल योगेश गावित, महेश सोनावले, राज मोसलगी, संतोष काळे, मारुती माने यांनी केली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला दंडाची शिक्षा सुनावण्यात आली.