सातारा - जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाचा राज्यातही प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. मुंबई पुणे, ठाणे, औरंगाबादसह, सोलापूर, सातारा येथेही दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णसंख्येत भर पडत आहे. साताऱा जिल्ह्यातील कराडमध्ये कोरोनाबाधिताच्या सहवासातील आणखी एकाचा अहवाल आज (शनिवार) कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तो पार्ले (ता. कराड) येथील कोविड सेंटरमध्ये दाखल होता.
101 नागरिकांचे अहवाल निगेटिव्ह...
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयील 2 महिला पोलिसांसह अन्य 5, कृष्णा रूग्णालय कराड येथील 29, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 49, उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथील 7 व ग्रामीण रुग्णालय वाई येथील 9, अशा एकूण 101 जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
172 नागरिकांना केले विलगीकरण कक्षात दाखल...
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे 17, कृष्णा रूग्णालय, कराड येथे 8, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे 106, ग्रामीण रुग्णालय, कोरेगाव येथे 14 व ग्रामीण रुग्णालय वाई येथे 27, अशा एकूण 172 जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले असल्याचेही डॉ. गडीकर यांनी सांगितले.