कराड (सातारा) : कराड-चांदोली मार्गावरील उंडाळे गावाजवळ काम सुरू असलेल्या पुलावरून मोटरसायकल खाली कोसळली. यात दोघे जागीच ठार झाले. तर एकजण गंभीररित्या जखमी झाला आहे. एकाच मोटरसायकलवरून तिघेजण चांदोलीकडून कराडकडे येत असताना हा अपघात झाला आहे. मृत आणि जखमी हे कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. दरम्यान, सोमवारी सकाळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन अपघाताची माहिती घेतली.
रविवारी (19 एप्रिल) मध्यरात्री झालेल्या या अपघातात मोटरसायकलवरील जानू भैरू झोरे आणि कोंडिबा भागोजी पाटणे हे दोघे जागीच ठार झाले आहेत. तर दगडू बिरू झोरे हा गंभीररित्या जखमी झाला आहे. ते भेंडवडी (ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. अपघातातील एका जखमीवर कराडमधील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून कराड-चांदोली मार्गाच्या विस्तारीकरण आणि मजबुतीकरणाचे काम सुरू आहे. सध्या या मार्गावरील उंडाळे गावानजीकच्या ओढ्यावरील पुलाचे बांधकाम सुरु आहे. त्यामुळे उंडाळेपासून कराडकडे येणारी काही अंतरावरील वाहतूक उत्तरेच्या बाजूने वळविण्यात आली आहे. उंडाळे बसस्थानक आणि पुलाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी सूचना फलकही लावण्यात आला आहे. असे असताना रविवारी मध्यरात्री मोटरसायकलस्वार सूचना फलकाकडे दुर्लक्ष करून भरधाव पुलावरून जात असताना हा भीषण अपघात झाला. पुलावरून मोटरसायकल खाली कोसळल्याने दोघांना आपला जीव गमवावा लागला आहे.
या भीषण अपघाताची माहिती मिळाल्यानंतर कराडचे पोलीस उपअधीक्षक डॉ. रणजित पाटील, कराड ग्रामीणचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांनी घटनास्थळी भेट देऊन अपघाताची माहिती घेतली. कराड ग्रामीण पोलीस या अपघाताचा तपास करत आहेत.