सातारा - खासदार उदयनराजेंनी पोवई नाक्यावर झाडाखाली पोत्यावर बसत टाळेबंदीच्या विरोधात हातात थाळी घेऊन भीक मांगो आंदोलन केले. राज्य शासनाने वीकेंड लाकडाऊनचा पूनर्विचार करावा, अशी मागणीही त्यांनी केली.
उद्रेकास प्रशासन जबाबदार -
खासदार उदयनराजे भोसले दुपारी एक वाजता पोवईनाका येथे आले. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केले व समोरच्या एका आंब्याच्या झाडाखाली पोते अंथरून थाळी घेऊन बसले. प्रशासनाने पुकारलेल्या टाळेबंदीचा निषेध केला. यावेळी उदयनराजे म्हणाले, की ही टाळेबंदी आम्हाला नको आहे. आमची जनता उपाशी मारणार असं ठरवलं आहे काय? पोलिसांनी जनतेचा उद्रेक पहिला तर त्याला जबाबदार प्रशासन राहील.
४५० रुपयांची भीक सरकार जमा -पोवाई नाक्यावरून ते चालत जिल्हाधिकारी कार्यालयात हातात ताट घेऊन गेले. मात्र, जिल्हाधिकारी कार्यालयात कोणीही अधिकारी उपस्थित नव्हते. त्यामुळे त्यांनी कोणी आहे का.. आमचे ऐकायला.. असे ओरडून विचारले. पोलिसांनी जिल्हाधिकारी व निवासी जिल्हाधिकाऱ्यांना फोन केल्यानंतर तहसिलदार बाहेर आले. त्यांनी ताटात जमा झालेली भिक मोजण्यास सांगितली. ४५० रूपये भरले. ही भीक घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील कोणाला तरी बोलवा, असे त्यांनी सांगितले. उदयनराजेंनी जमा झालेली चारशे रूपयांची रक्कम तहसिलदारांकडे सुपूर्द केली.
तर हत्तीच्या पायी दिलं असतं -
जोपर्यंत शास्त्रज्ञ सांगत नाहीत तोपर्यंत नो लॉकडाऊन, उदयापासून सगळे सुरू होणार आहे, असा इशारा त्यांनी दिला. आज राजेशाही असती तर टाळेबंदी करणाऱ्या व पैसे खाणाऱ्या सगळ्यांना मी हत्तीच्या पायाखाली तुडवलं असतं, असंही उदयनराजेंनी बोलून दाखवले. यावेळी उदयनराजे यांनी सचिन वाझे प्रकरणासह इतर सर्वच विषयांवर राज्य सरकारवर टीका केली. शासनाच्या कारभाराचा त्यांनी निषेध केला.