सातारा - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेत माण-खटावमधील नऊ विध्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले आहे. दुष्काळी पट्ट्यातील माणदेशी मानरत्नांनी स्पर्धा परीक्षेत माणदेशी झेंडा फडकवला असून प्रतिकूल परिस्थितीवर मात करून माणदेशी विद्यार्थ्यांनी बुद्धीच्या जोरावर मिळविलेले यश अनेकांना प्रेरणादायी ठरणारे आहे. 'मी पण अधिकारी होणार, अशी खूणगाठ माणदेशी विद्यार्थी मनाशी बांधताना दिसून येत आहेत.
नेहमीच निसर्गाची अवकृपा असलेले सातारा जिल्ह्यातील माण-खटाव हे तालुके राज्यामध्ये दुष्काळी तालुके म्हणून ओळखले जातात. कमी पर्जन्यमान, टँकरच्या फेऱ्या, चाराछावण्या, मजुरांचे स्थलांतर, मेंढपाळांची भटकंती अशी ओळख असलेल्या माण-खटावच्या जनतेला दुष्काळी परिस्थितीशी संघर्ष करावा लागत आहे. कोणताही साखर कारखाना, औद्योगिक वसाहत, याशिवाय बागायती क्षेत्र नसल्याने येथील सर्वसामान्य जनतेला नेहमीच परिस्थितीशी झगडावे लागत आहे. मात्र, अशा प्रतिकूल परिस्थितीतही हार न मानता माणदेशातील अनेकांनी बुद्धीच्या जोरावर यश मिळवून नावलौकिक मिळविले आहे.
नैसर्गिकदृष्ट्या दुष्काळ असला तरीही माणदेश म्हणजे बुद्धीचा सुकाळ असल्याचे अनेकांनी सिद्ध केले आहे. बुद्धिवंतांची खाण असलेल्या माण-खटावमधील प्रभाकर देशमुख, नितीन वाघमोडे, नितीन खाडे, तानाजी सत्रे, चंद्रकांत दळवी, सुदाम खाडे यासारख्या माणरत्नांनी स्पर्धा परीक्षेत यश मिळवून राज्य सरकारच्या विविध विभागात उच्चपदावर सेवा बजावत माणदेशी रत्ने कोणत्याही क्षेत्रात मागे नसल्याचे सिद्ध केले आहे. माणदेशातील या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा आदर्श व प्रेरणा घेऊनच गेल्या काही वर्षात माण-खटावमधील अनेक विद्यार्थ्यांचा स्पर्धा परीक्षा देण्याकडे अधिक कल असल्याचे दिसून येत आहे.
नुकत्याच जाहीर झालेल्या महाराष्ट्र राज्यसेवा परिक्षेच्या निकालामध्ये माण-खटावमधील नऊ विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवून उज्ज्वल यश संपादन केले आहे. यामध्ये माण तालुक्यातील गोंदवले येथील प्रगती कट्टे व गौरी कट्टे या दोघी बहिणींनी सध्या कोल्हापूर याठिकाणी पोलीस उपनिरीक्षक कार्यरत असलेल्या गोंदावले येथील प्रेरणा कट्टे यांची प्रेरणा घेत यश मिळवले आहे. प्रगती हिची नायब तहसीलदार पदावर तर गौरी कट्टे हिची मंत्रालयात कक्ष अधिकारी पदासाठी निवड झाली आहे. तर, लोधवडे येथील चैतन्य कदम याने माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांची प्रेरणा घेऊन यश प्राप्त केले असून त्याची पोलीस उपअधीक्षक पदासाठी निवड झाली आहे. तर, सध्या सातारा याठिकाणी विक्रीकर उपायुक्त असलेल्या पळशी येथील विकास गंबरे यांने पळशी येथील अनेक उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची प्रेरणा घेऊन दुसऱ्या वेळी राज्यसेवा परीक्षेत यश मिळविले असून त्याची तहसीलदार पदावर निवड झाली आहे. सध्या मंडल कृषी अधिकारी पदावर असलेल्या जाधववाडी येथील प्रवीण जाधव यानेही प्रतिकूल परिस्थितीवर मात करून सलग दुसऱ्यांदा यश मिळवले असून त्याची नायब तहसीलदारपदी निवड झाली आहे.
राज्यसेवा परीक्षेत खटाव तालुक्यातील चार विद्यार्थ्यांनी बाजी मारली असून गारवडी येथील राजेश कदम व योगेश कदम या सख्ख्या भावांची गटविकास अधिकारी पदासाठी निवड झाली आहे. तर, नढवळ येथील अश्विनीकुमार माने याची राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पोलीस उपअधीक्षक पदासाठी निवड झाली असून अधिकाऱ्यांचे गाव म्हणून ओळख असलेल्या एनकूळ येथील श्वेता खाडे हिची पोलीस उपअधीक्षकपदी निवड झाली आहे.
माण-खटाव या दुष्काळी तालुक्यांना पूर्वीपासून स्पर्धा परीक्षेतील गुणवत्तेचा वारसा असून गेल्या काही वर्षात माणमधील प्रसाद मेनकुदळे, विक्रम वीरकर, प्रेरणा कट्टे, शैलजा दराडे, सचिन ओंबासे, प्रवीण इंगवले यासारख्या माण-खटाव मधील अनेकांनी स्पर्धा परीक्षेद्वारे यश मिळवून विविध उच्च पदावर सेवा बजावत माणदेशचा झेंडा देशाच्या कानाकोपऱ्यात फडकवण्याचे काम केले आहे. केवळ बुद्धीच्या जोरावर माणदेशी विध्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत मिळविलेले यश आकाशाला गवसणी घालणारे तसेच अनेकांना प्रेरणादायी असेच म्हणावे लागेल.