सातारा - वीर धरण परिसरात तोंडल ( ता खंडाळा ) गावच्या हद्दीत रंगलेल्या पार्टीत दारु पिऊन हवेत गोळीबार करणाऱ्या बारामती व खंडाळा तालुक्यातील नऊ जणांच्या टोळक्याला शिरवळ पोलीसांनी अटक केली. या घटनेमुळे सातारा जिल्ह्यासह खंडाळा तालुक्यात खळबळ उडाली आहे.
हे आहेत संशयित
किरण देविदास निगडे (वय ४६ रा. गुळूंचे ता. पुरंदर), सूर्यकांत चंद्रकांत साळूंखे (वय २८, रा. कानिफनाथवस्ती, भादे ता. खंडाळा), नवनाथ बबन गाडे (वय ३४, रा. चोपडज, पोस्ट करंजे, ता. बारामती ), माधव अरविंद जगताप (वय ३२,रा. वाकी पोस्ट करंजे ता. बारामती ), तात्याराम अर्जून बनसोडे (वय ३८, रा. अंथूर्णे ता.इंदापूर जि. पुणे), विजय ज्ञानदेव साळूंखे (वय ३९, रा. चोपडज (सोमेश्वर) पोस्ट करंजे ता.बारामती ), योगेश प्रकाश रणवरे (वय ४२, रा. राख ता. पुरंदर ), वसंत नामदेव पवार (वय ४७,रा. कोळविहीरे ता. पुरंदर ), अरविंद घनशाम बोदेले (वय ४१, सध्या रा. लवथळेश्वर, जेजूरी ता.पुरंदर, मूळ रा.भिवापूर जि.नागपूर) असे अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
रिव्हाँल्व्हरची संपली होती मुदत
किरण निगडे यांच्या मालकीची शासनाची परवान्याची मुदत संपलेली रिव्हॉल्व्हर, दोन कार, मोबाईल आदी मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे किरण निगडे याने स्वत: दहशत पसरविण्याच्या उद्देशाने रिव्हाँल्व्हरद्वारे हवेत गोळीबार केला. तसेच मिञ योगेश रणवरे याला रिव्हाँल्व्हर देत त्यानेही हवेत गोळीबार करीत वीर धरण परिसरात दहशत माजविण्याचा प्रयत्न केला आहे. याबाबतची माहिती मिळताच तत्काळ शिरवळ पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत गोळीबार करणाऱ्यांच्या मुसक्या आवळत पोलीसी खाक्या दाखविला.
शिरवळ पोलिसांत गुन्हा
याप्रकरणी शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार मदन वरखडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार किरण निगडे याच्यासह नऊ जणांविरुध्द शिरवळ पोलीस ठाण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा, भारतीय शस्ञ अधिनियमांसह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे हे करीत आहे.