सातारा - रामराजे गटातर्फे कोळकी येथे अनंत मंगल कार्यालयात कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला फलटण तालुक्यासह खंडाळा आणि कोरेगाव तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर पक्षांतर करून कोणत्या पक्षात जाणार हे ऐकण्यासाठी कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. गुरुवारी सायंकाळी रामराजे नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी आयोजित केलेल्या बैठकीत रामराजे नाईक-निंबाळकर शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा निर्णय निश्चित केला होता.
शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत रामराजे निर्णय जाहीर करणार असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये होती. पण त्यांनी कोणताच निर्णय जाहीर न केल्याने कार्यकर्त्यांचा विरस झाला. गेल्या पंचवीस वर्षातील राजकीय कारकिर्दीचा आढावा घेत, विकासाचा मुद्दा महत्त्वाचा असल्याचा आणि त्यासाठी सत्तेची आवश्यकता असते हे सांगत निर्णय घेण्यासाठी विकासा बरोबरच तरुणाईच्या मनात काय आहे, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. तरुणाईने आपल्या भावना व्यक्त केलेल्या नाहीत, त्यामुळे दिशा निश्चित करता येत नाही. आजची तरुण पिढीही या मतदान प्रक्रियेमध्ये अत्यंत महत्त्वाची असल्याने त्यांची मते जाणून घेणे गरजेचे असल्याचे रामराजे यांनी सांगितले.
प्रास्ताविकामध्ये संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले की, चांगल्या कामासाठी समविचारी लोकांनी एकत्र येणे गरजेचे आहे. तत्पूर्वी यावेळी बहुतांश कार्यकर्त्यांनी रामराजे ज्या पक्षात जातील त्या पक्षाचा झेंडा हातात घेऊन काम करण्याचा मनोदय व्यक्त केला होता. तर फलटण तालुक्याच्या विकासासाठी, जिल्ह्याच्या विकासासाठी सत्तेमध्ये असणे गरजेचे आहे.म्हणून पक्षांतराचा निर्णय घेण्यात यावा असाही आग्रह काही कार्यकर्ते करीत होते. यावेळी सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष रघुनाथराजे निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, श्रीराम सहकारी अध्यक्ष बाळासाहेब शेंडे, बंटीराजे खर्डेकर या मान्यवरांशिवाय फलटण राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.