सातारा शूरवीरांची भूमी असलेल्या सातार्याचे सुपुत्र कर्नल संतोष महाडिक 17 नोव्हेंबर 2015 रोजी काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना हुतात्मा झाले. सातार्यातील पोगरवाडी या छोट्या गावातील संतोष यांच्या हौतात्म्याने अवघ्या महाराष्ट्राच्या डोळ्यात पाणी होते. पतीचे पहिले प्रेम असलेला लष्करी गणवेश परिधान करण्यासाठी, त्यांच्या (Nari Shakti) पत्नी स्वाती महाडिक (Lt Swati Mahadik) यांनी लष्करात भरती होण्याचा निर्णय घेतला. कठोर परिश्रमानंतर त्या लष्कराच्या ऑर्डनन्स कोअरमध्ये लेफ्टनंटपदी रूजू झाल्या. एका लष्करी अधिकार्याची पत्नी, शिक्षिका ते स्वतः लष्करी अधिकारी बनण्याचा हा प्रवास त्यांच्यासाठी खूपच खडतर होता. जाणुन घेऊया त्यांच्या या खडतर व प्रेरणादायी (Inspirational journey of Lt Swati Mahadik) प्रवासा विषयी.
दहशतवाद्यांशी लढताना पतीला हौतात्म्य : कर्नल संतोष महाडिक हे 17 नोव्हेंबर 2015 रोजी कुपवाडाच्या जंगलात लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवाद्यांशी लढताना शहीद झाले. वयाच्या अवघ्या 39 व्या वर्षी त्यांना हौतात्म्य आले. त्याचा स्वाती यांना मोठा धक्का बसला. कर्नल संतोष महाडिक यांच्या अतुलनीय पराक्रमाबद्दल मरणोत्तर शौर्यचक्र जाहीर झाले. त्यांची पत्नी स्वाती यांना राष्ट्रपतींच्या हस्ते शौर्यचक्र प्रदान करण्यात आले होते. कर्नल संतोष यांचे पहिले प्रेम म्हणजे गणवेश होता. त्यामुळे सैन्यात भरती होऊन पतीची जबाबदारी पार पाडण्याचा निर्धार स्वाती महाडिक यांनी केला. स्टाफ सिलेक्शन बोर्डाची परीक्षा देण्यासाठी वयाची अडचण येत होती. म्हणून तत्कालिन संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी लष्करप्रमुख दलबीर सिंग यांच्याशी चर्चा करून वयात सूट देण्याची शिफारस केली होती. दोन लहान मुलांना घरी ठेवून स्वाती यांनी पुणे गाठले. चांगला अभ्यास करून अवघ्या नऊ महिन्यात त्या परीक्षा पास झाल्या. चेन्नई येथील ऑफिसर्स ट्रेनिंग अॅकॅडमीमधून 11 महिन्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्या लष्कराच्या ऑर्डनन्स कोअरमध्ये लेफ्टनंटपदी रूजू झाल्या.
स्वत: सैन्य अधिकारी बनण्याचा खडतर प्रवास : पुण्याच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून एम. ए. झालेल्या स्वाती यांनी ऑटिझम असलेल्या मुलांबाबत विशेष प्रशिक्षण घेतले होते. पती संतोष यांच्यासोबत बदलीच्या ठिकाणी त्या केंद्रीय विद्यालयामध्ये शिक्षिका म्हणूनही काम करत होत्या. एका लष्करी अधिकार्याची पत्नी, शिक्षिका या जबाबदार्या त्या पार पाडत होत्या. पती शहीद झाल्यानंतर त्यांनी पतीचे पहिले प्रेम असलेला लष्करी गणवेश परिधान करून, हुतात्मा पतीची अपूर्ण जबाबदारी पार पाडण्यासाठी; घेतलेले कष्ट समाजापुढे आदर्श ठरले आहेत. त्यांच्या रूपाने सैन्य दलाला महिला अधिकारी देऊन सातारा जिल्ह्याच्या मातीने 'शूरवीरांची भूमी' ही बिरूदावली सार्थ ठरवली आहे.
माझ्या रक्ताचा प्रत्येक थेंब देशासाठी : पतीच्या हौतात्म्यानंतर स्वाती यांना मोठा धक्का बसला होता. डोंगराएवढे दु:ख पचवून, धक्क्यातून सावरल्यानंतर त्यांना पूर्वीपेक्षा अधिक मजबूत वाटायला लागले. त्यांनी सैन्य दलात भरती होण्याची इच्छा व्यक्त केली. शत्रूंचा बदला घेण्यासाठी स्वाती महाडिक यांनी अश्रू पुसून; सैन्य दलात भरती होण्यासाठी स्वत:चा उत्साह वाढवला. सैन्य दलात लेफ्टनंटपदी रूजू झाल्यानंतर 'माझ्या रक्ताचा प्रत्येक थेंब आजपासून देशाच्या नावे आहे', अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. स्वाती महाडिक या रणरागिनीने आपला लढवय्या बाणा यावेळी स्पष्ट केला होता. लष्करी अधिकारी असलेल्या पतीच्या हौतात्म्यानंतर पत्नी स्वाती महाडिक यांनी सैन्य दलात भरती होण्याचा केलेला निर्धार, देशातील महिलांसाठी अभिमानास्पद आणि तितकाच प्रेरणादायी आहे.
हेही वाचा : जागतिक महिला दिन : पंतप्रधान नरेंद्र मोदींचे टि्वटर खाते सांभाळतायत 'या' 7 महिला