सातारा - चारित्र्याच्या संशयावरून डोक्यात कुर्हाडीने घाव घालून पतीनेच पत्नीचा खून केल्याची खळबळजनक घटना शनिवारी रात्री 9 च्या सुमारास कराड तालुक्यातील येवती गावात घडली. याप्रकरणी कराड ग्रामीण पोलिसांनी पतीला ताब्यात घेतले आहे. रेखा विनोद कांबळे (वय 35) असे खून झालेल्या महिलेचे नाव असून विनोद रामचंद्र कांबळे, असे खूनप्रकरणी ताब्यात घेतलेल्या पतीचे नाव आहे.
हेही वाचा - दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी सरकार कटीबद्ध - रामदास आठवले
रेखा कांबळे आणि विनोद कांबळे यांना एक मुलगा आणि एक मुलगी, अशी दोन अपत्ये आहेत. एक वर्षापासून विनोद हा दारू पिऊन पत्नीवर चारित्र्याचा संशय घेऊन तिला मारहाण करत होता. सहा महिन्यांपुर्वी रेखाची सासू आजारी असल्याने तिला कराडच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यावेळी विनोदने मेव्हण्याला फोन करून हॉस्पिटलमध्ये बोलावून घेतले होते. विनोदने मेव्हण्यासमोर पत्नीवर संशय व्यक्त केला होता. त्यानंतर रेखा माहेरी गेली होती. चारित्र्याच्या संशयावरून शिवीगाळ, मारहाण करत असल्याने रेखाने विनोदविरोधात पोलीस ठाण्यात तक्रारही केली होती.
विनोद याने शनिवारी (दि. 2 नोव्हेंबर) रात्री 9 च्या सुमारास पत्नी रेखाच्या डोक्यात कुर्हाडीने घाव घातले. त्यात ती गंभीर जखमी झाली. रेखाला कराडच्या खासगी रूग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. मात्र, कुर्हाडीचा घाव वर्मी लागल्याने तिचा मृत्यू झाला. पत्नीच्या खूनप्रकरणी कराड ग्रामीण पोलिसांनी पती विनोद कांबळे याला ताब्यात घेतले आहे. पोलीस उपनिरीक्षक अशोक भापकर पुढील तपास करत आहेत.