सातारा - खासदार उदयनराजे भोसले मंगळवारी रात्री सुरुची राड्याप्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात हजर झाले. कायदेशीर व न्यायालयीन प्रक्रिया केल्यानंतर ते निघून गेले. दरम्यान, ते अचानक पोलीस ठाण्यात गेल्यानंतर परिसरात चर्चेला उधाण आले आहे.
उदयनराजे सुरुची राडा प्रकरणात संशयित आरोपी आहेत. २ वर्षांपूर्वी कोजागिरी पोर्णिमेच्या दिवशी झालेल्या या घटनेने सातारा हादरून गेला होता. या प्रकरणी खासदार व आमदार यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. यातील एका गुन्ह्याचा तपास तालुका पोलीस ठाण्यात सुरू आहे.
या कामासंबंधी उदयनराजे मंगळवारी सायंकाळी तालुका पोलीस ठाण्यात गेले. त्यावेळी त्यांच्यासोबत कार्यकर्तेही उपस्थित होते. सुमारे १५ मिनिटानंतर ते तेथून निघून गेले. दरम्यान, या घटनेची माहिती साताऱ्यात पसरल्यानंतर पोलीस ठाण्याबाहेर बघ्यांची गर्दी उसळली होती.