सातारा : ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल न मिळाल्याने सातारा लोकसभा मतदारसंघातील एका विद्यार्थिनीने आत्महत्या केली असल्याची बाब खा. श्रीनिवास पाटील यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात लोकसभा सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. शेतकरी, कष्टकर्यांच्या मुलांना भौतिक सुविधा उपलब्ध होत नसतील, तर अशा मुलांचे भवितव्य कसे घडणार, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
लोकसभेत राष्ट्रपतींच्या अर्थसंकल्पीय अभिभाषणाच्या धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेत खा. पाटील यांनी ऑनलाईन शिक्षण प्रणालीतील त्रुटींकडे सभागृहाचे लक्ष वेधले. सातारा लोकसभा मतदार संघातील एका मुलीने ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल न मिळाल्याने आत्महत्या केल्याचे सांगून शेतकरी, कष्टकर्यांच्या मुलांना भौतिक सुविधा उपलब्ध होत नसतील तर अशा अशिक्षित मुलांचे भवितव्य तरी कसे घडणार, असा प्रश्न उपस्थित केला. मोबाईलची मुलांना आता सवय झाली आहे. त्यामुळे ऑनलाईन शिक्षणासाठी आम्ही शक्य होईल ती मदत केली. परंतु, सरकारनेही या संदर्भात ठोस प्रयत्न केले पाहिजेत, असे खा. पाटील म्हणाले.
सैनिक स्कूलच्या निधीबाबतही उठवला आवाज..
स्व. यशवंतराव चव्हाण यांनी 1961 साली सातारा येथे सैनिक स्कूलची पायाभरणी केली होती. मात्र, या सैनिक स्कूलला पुरेसा निधी मिळत नसल्याचे सांगून सातारा सैनिक स्कूलच्या प्रलंबित प्रश्नांकडेही खा. पाटील यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.
हेही वाचा : VIDEO : शशी थरुरांनी हिंदीमध्ये व्यक्त केली अर्थसंकल्पावर नाराजी; पाहा व्हिडिओ..