कराड (सातारा) - वीज बिले थकीत असणार्या 50 हजार 835 ग्राहकांना महावितरण कंपनीने थकबाकीच्या नोटीसा पाठवत टाळेबंदीनंतर जबर झटका दिला आहे. मार्च ते 15 नोहेंबर या 9 महिन्यात एकही रुपया वीजबिल न भरलेल्या ग्राहकांना थकबाकीच्या नोटिसा पाठविण्यात येत आहेत. पहिल्या टप्प्यात कराड तालुक्यातील तब्बल 50 हजार 835 ग्राहकांना या नोटीसा जाणार आहेत. त्यांच्याकडे 27 कोटींची थकबाकी असून एकूण वीज बिलाची थकबाकी ही 37 कोटी 39 लाख रूपये इतकी आहे.
नऊ महिन्यानंतर वीजबिल वसुलीची मोहिम सुरू
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मार्चपासून टाळेबंदी करण्यात आली होती. टाळेबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच उद्योग व व्यवसाय बंद राहिल्याने समाजातील सर्वच स्तरातील लोकांचे अर्थिक गणित कोलमडले. त्यामुळे ग्राहकांनी वीज बिले भरलेली नाहीत. महावितरणने सक्तीची वीजबिल वसुली करू नये, अशा सुचना शासनाने दिल्या आहेत. पण, टाळेंबदीमध्ये शिथीलता आणल्यानंतर उद्योगधंदे आणि व्यवसाय पुर्वपदावर येत आहेत. त्यामुळे महिन्यापासून बंद असलेली वीजबिल वसुलीची मोहिम महावितरणने सुरू केली आहे.
2 लाख 34 हजार ग्राहकांकडे 37 कोटी 39 लाखांची थकबाकी
कराड तालुक्यात घरगुती, व्यवसायिक आणि औद्योगिक मिळून एकूण 2 लाख 34 हजार इतके वीज ग्राहक आहेत. यातील 1 लाख 5 हजार 807 ग्राहकांकडे 37 कोटी 39 लाख रूपयांचे वीजबिल थकीत आहेत. महावितरणने सरसकट ग्राहकांवर वसुलीचा बडगा न उगारता वसुलीसाठी टप्पे तयार केले आहेत. पहिल्या टप्प्यात मार्चपासून 15 नोहेंबर या 9 महिन्यात एकही रूपाया न भरणार्या ग्राहकांची यादी तयार केली आहे. त्यांना वसुलीसाठी लेखी, मोबाईल अथवा व्हॉटस्अॅपद्वारे नोटीसा पाठवण्यात येत आहेत. पहिल्या टप्प्यात कराड तालुक्यातील 50 हजार 835 ग्राहकांना या नोटीसा पाठविण्यात येत आहेत. त्यांच्याकडे 27 कोटींची थकबाकी आहे.
हजारो रूपयांच्या वीजबिलांचा झटका
नऊ महिन्यानंतर प्रथमच महावितरणची नोटीस हातात पडल्याने ग्राहकांना झटका बसला आहे. बहुतांश ग्राहकांनी टाळेबंदीच्या काळात वीजबिल भरले नसल्याने वीज बिलांचे आकडे फुगले आहेत. हजारो रूपयांचे वीजबिल आल्याने ग्राहकांना शॉक बसला आहे.
1 लाख 28 हजार ग्राहकांनी भरले 70 कोटी
कराड तालुक्यातील एकूण थकबाकीदारांपैकी 1 लाख 28 हजार 193 ग्राहकांनी वीजबिलांचे 70 कोटी रूपये भरले आहेत. टाळेबंदीच्या काळात वीज भरणा केंद्र बंद असल्याने बहुतांष ग्राहकांनी ऑनलाईन बिले भरली आहेत.
एकीकडे आंदोलन, दुसरीकडे वसुली
टाळेबंदीच्या काळातील वीजबिलांच्या माफीसाठी राज्यभरात विविध पक्ष आणि संघटनांकडून आंदोलने केली जात आहेत. तर दुसरीकडे महावितरणने वसुलीसाठी तगादा लावला आहे. त्यामुळे वीजबिले भरायची की नाहीत, अशा पेचात ग्राहक सापडला आहे.
बिले भरण्यासाठी हप्त्यांची सोय
नऊ महिन्यांचे वीजबिल एकरकमी भरणे शक्य नाही. ही परिस्थिती जाणून महावितरण कंपनीने वीजबिले भरण्यासाठी ग्राहकांना हप्ते बांधून दिले आहेत. रकमेनुसार दोन-तीन हप्त्यांत बिले भरण्याची सोय करून दिली आहे.
हेही वाचा - आनेवाडी टोलनाका आंदोलनप्रकरणी शिवेंद्रसिंहराजे व १७ समर्थकांना जामीन