सातारा - खोकेवाल्यांनी औंधच्या विकासाची चिंता करू ( Development of Aundh area ) नये. औंधच्या विकासासाठी मी कटीबद्ध असल्याचे सांगत सातारा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांनी कोरेगावचे आमदार महेश शिंदे ( MLA Mahesh Shinde ) यांचा खरपूस समाचार घेतला. राजकीय स्वार्थासाठी एका महिलेवर आरोप करत कोरेगावच्या आमदारांचा प्रसिध्दीसाठी खटाटोप सुरू आहे. आमचे बोट धरून त्यांची राजकीय सुरूवात झाली आहे, असेही गायत्रीदेवी म्हणाल्या. औंधमधील विकासकामांच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या.
औंधच्या विकासाचा आमदारांना पोटशूळ - मी नेहमीच समाजाच्या हिताला प्राधान्य दिले आहे. कधीच सूडबुद्धीने राजकारण केले नाही. परंतु, अपघाताने झालेल्या कोरेगावच्या आमदारांना औंधच्या विकासामुळे पोटशूळ उठला आहे. कोरेगाव विधानसभा मतदारसंघात ( Koregaon Assembly Constituency ) औंध संस्थानवर प्रेम करणारी अनेक गावे आहेत. लोकांची दिशाभूल करुन आपली राजकिय पोळी भाजणाऱ्या प्रवृतीला येत्या काळात जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या मतदारसंघाची तुम्ही काळजी करा. आमच्या विकासकामात लुडबूड करु नका, असा इशाराही गायत्रीदेवींनी दिला.
गायत्रीदेवी होत्या जिल्हा बँकेसाठी इच्छुक - सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महिला राखीवमधून जिल्हा बॅंकेवर कोण संचालक होणार याची उत्सुकता होती. औंधच्या गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांचा खटाव तालुक्यातील सोसायटीतून ठराव करण्यात आलेला होता. त्यामुळे त्यांना सोसायटी मतदारसंघातून अथवा महिला राखीवमधून संचालकपदी संधी मिळणार, अशी चर्चा होती. मात्र, राजकीय तडजोडीत त्यांचा पत्ता कट झाला.
प्रभाकर घार्गेंनी तुरूंगातून निवडणूक लढवली - माजी आमदार प्रभाकर घार्गे यांना पुन्हा संधी दिल्यास गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांना महिला राखीव मतदारसंघातून संचालकपदी संधी दिली जाण्याची शक्यता होती. बॅंकेच्या मागील निवडणुकीत देखील गायत्रीदेवी पंतप्रतिनिधींना संधी मिळाली नव्हती. त्यामुळे या निवडणुकीत सोसायटी किंवा महिला राखीवमधून संधी मिळेल, असे बोलले जात होते. तथापि, खटाव तालुका सोसायटी मतदार संघातून माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी तुरूंगातून निवडणूक लढवत विजय मिळवला.