सातारा : नगरपालिका निवडणूक तोंडावर आल्यामुळे साताऱ्यात आमदार शिवेंद्रराजे आणि राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांच्यामध्ये विकासकामांवरून श्रेयवावाद उफाळला आहे. यावरून एकमेकांवर पत्रकबाजी आणि टीका-टीपण्णी सुरू आहे. श्रेयवादावरून आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी खासदार उदयनराजेंवर खोचक टीका केली आहे. साताऱ्यात ऑक्सिजन उदयनराजेंमुळेच येतोय, हा डायलॉग अजून ऐकायला मिळाला नाही, हेच सातारकरांचे नशीब, अशी टीका शिवेंद्रराजेंनी उदयनराजेंवर केली आहे. ते साताऱ्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.
शिवेंद्र राजेंची उपहासात्मक टीका : शिवेंद्रराजे पत्रकार परिषदेत पुढे म्हणाले की, जिल्ह्यातील सर्वच नगरपालिकांना नगरोत्थानमधून निधी वाढवून मिळावा, अशी माझी भूमिका आहे. ही कामे माझीच आहेत. मी स्वतः बैठकीला होतो. माझ्या सह्या असून कामे मंजूर करून आणण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्यामुळे श्रेय घेण्याचा विषय येत नाही. सातारकरांना कामांचे श्रेय कोण घेत आहे, हे सातारकरांना माहित आहे. सातार्यात ऑक्सिजन पण उदयनराजेंमुळेच येतोय हे अजून ऐकायला मिळाले नाही, एवढेच आपले नशीब, अशी उपहासात्मक टीका आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी केली.
मिटींगला मी हजर असतो : ते पुढे म्हणाले की, आम्ही आणलेल्या निधीचे आमदार श्रेय घेत आहेत, असे खासदार उदयनराजे भोसले यांनी म्हटले आहे. परंतु, मी ज्या कामांची यादी दिली ती डीपीडीसीतून मिळालेल्या निधीची होती. मला काही श्रेय घ्यायचे नाही. पालकमंत्री, जिल्हाधिकारी व जिल्हा नियोजन मंडळाला या कामांचे पत्र देऊन ही कामे प्राधान्याने घ्यावीत. त्यात अजिंक्यतारा किल्ल्याचे काम घ्यावे, यासाठी मी आग्रही राहतो. मी स्वतः डीपीडीसीच्या मिटींगला हजर असतो. मिटींगचे रेकॉर्ड डीपीडीसीत आहे, असा सूचक इशारा त्यांनी दिला आहे.
त्यांचे डायलॉग ठरलेलेच : साताऱ्यातच नव्हे तर जिल्हयात एखादे मोठे काम आले की ते मीच केले म्हणायचे आणि कुठली कामे झाली नाहीत तर ते लोकप्रतिनिधी निष्क्रीय आहेत, हा त्यांचा ठरलेला डायलॉग असतो. ऑक्सिजन पण उदयनराजेमुळेच येत आहे, हे सातार्यात अजून ऐकायला मिळाले नाही एवढेच आपले नशीब आहे, असा टोला देखील त्यांनी लगावला.