सातारा - मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी गेली अनेक वर्षांपासून शांततेच्या मार्गाने आंदोलने होत आहेत. मात्र यावर अजून ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. तसेच सारथी संस्थेबाबत गुरुवारी अजित पवार यांच्या दालनात बैठक घेण्यात आली. त्यावेळी कोल्हापूरचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांना तिसऱ्या रांगेत बसवून जी वागणूक देण्यात आली, ही गोष्ट चुकीची असल्याचे मत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.
छत्रपती संभाजीराजे हे शाहूमहाराजांचे वंशज आहेत. त्याचबरोबर त्यांनी मराठा आरक्षणासाठी लढा देखील दिलेला आहे. त्यामुळे अशा व्यक्तीला ही वागणूक देणे योग्य नसल्याची प्रतिक्रिया आमदार छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली आहे.
मराठा समाजाचा प्रतिनिधी म्हणून आलोय- संभाजीराजे
अजित पवारांसोबतच्या सारथी बाबतच्या बैठकीवेळी संभाजीराजे छत्रपती हे तिसऱ्या रांगेतील आसनावर जाऊन बसले होते. कार्यकर्त्यांनी गोंधळ घालायला सुरुवात करताच त्यांनी मी मराठा समाजाचा प्रतिनिधी म्हणून येथे आलो असल्याची प्रतिक्रिया दिली. त्यानंतर अजित पवार यांच्या दालनात बैठक पार पडली. त्यावेळी सारथीसाठी सरकारने ८ कोटी रुपायांचा निधी तत्काळ देण्याचे मान्य केले, तसेच सारथी बंद होणार नसल्याचेही स्पष्ट केले.