सातारा - जमिनीवर पाय असलेला लोकप्रतिनिधी म्हणून जामखेडचे आमदार रोहीत पवार यांची महाराष्ट्राला ओळख आहे. रस्त्यात जाताना खटाव-माण तालुक्याच्या हद्दीवर अपघातग्रस्तांना त्यांनी केलेली मदत व दिलेला वेळ त्यांचे वेगळेपण अधोरेखीत करणारे आहे. त्यांच्या या मदतीच्या वृत्तीमुळे उपस्थितांमधून कौतुक झाले.
शेतकऱ्याच्या वाहनाला अपघात
जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहीत पवार, त्यांचे वडील राजेंद्र पवार आणि मातोश्री सुनंदाताई पवार हे कराड येथून नातेवाईकांच्या अंत्यविधीवरुन बारामतीकडे निघाले होते. त्यांचे मित्र छत्रपती शिवाजी शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष पृथ्वीराज गोडसे व इतर यांच्यासोबत वडूज ते गोंदवले प्रवास सुरू होता. मांडवे (ता. खटाव) ते पिंगळी (ता. माण) दरम्यान अपघातग्रस्त वाहन त्यांना दिसले. दहिवडी येथील शेतकरी शेतीमाल विक्रीसाठी नेत असताना झालेल्या अपघातात वाहन रस्ता सोडून उलटले होते.
वलय असूनही पाय जमिनीवर
आमदार रोहित पवार यांनी गाडी थांबविण्यास सांगून तातडीने अपघातस्थळी धाव घेतली. जखमी शेतकऱ्याची चौकशी करत अपघातग्रस्त गाडी स्वतः ढकलत रस्त्यावर आणली. राजकारणात पवार घराण्याचे मोठे वलय लाभलेले आमदार रोहित पवार राजकारणात असुनही त्यांचे पाय जमिनीवर आहेत.