सातारा - रामराजेंनी आपले गबाळ बांधून पलायन करावे, त्यांची पापे खूप झाली असल्याचे वक्तव्य काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांनी केले आहे. रामराजे नाईक निंबाळकर यांनी जिल्ह्यातील ३ कुत्री पिसाळलेली आहेत, असे म्हणत खासदार उदयनराजे भोसले, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार जयकुमार गोरे यांच्यावर जोरदार टीका केली होती. या टीकेला प्रत्युत्तर देताना माण खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी रामराजेंवर निशाणा साधला.
रामराजेंनी राजकीय फायद्यासाठी नीरा देवधरचे पाणी बारामतीला दिले. त्यासाठी त्यांनी कालवे नसल्याचे कारण दिले. ज्या लोकांनी त्यांना पंचवीस वर्षे विधानसभेत पाठवले त्या लोकांना पाणी देण्यासंदर्भात कुठली कारवाई केली. सगळे त्यांच्या हाती होते. मात्र, ते फक्त बारामतीची चाकरी करत होते. आम्हाला फक्त दुष्काळी भागाला पाणी मिळावे एवढीच अपेक्षा होती, असे गोरे म्हणाले.
मेंदूचा ताबा सुटलाय-
प्रश्नाला बगल देऊन अनावश्यक विषय काढायची रामराजे यांची सवय आहे. त्यांनी केलेले पाप आम्ही सांगितले. त्यांची चोरी आम्ही सांगितली. तर आमचे काय चुकले, असे गोरे म्हणाले. सर्वोच्च पदावर बसलेल्या व्यक्तीने हे बोलणे शोभते का? एका विशिष्ट वयात मेंदू चालायचा बंद होतो. मेंदूचा ताबा सुटतो. आपले वय राहिले नाही. आमची विनंती आहे. त्यांनी "राजकारणातून निवृत्ती स्विकारावी" आपण केलेली पाप खूप झाली आहेत. "आपण आपले गबाळ बांधून पलायन करावे" ही आमची विनंती आहे, अशी टीका गोरेंनी केली.
आम्ही पिसाळलेले आहोत. "पिसाळलेले कुत्र चावलं तर आपल्याला किती इंजेक्शन घ्यावे लागतात ते तुम्हाला माहीत नसावे". तुमची तेवढे इंजेक्शन घ्यायची क्षमता देखील नाही" आपण जास्त बोलू नये. अशा शब्दात आमदार गोरे यांनी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या वरती टीका केली.