सातारा - आमदार जयकुमार गोरे यांचा जनाधार राहिला नसल्यामूळे ते आता कधीच निवडून येणार नाहीत. म्हणून ते भाजपमध्ये प्रवेशासाठी धडपडत आहेत. मात्र, विनयभंगाचे गुन्हे दाखल असणाऱ्या गोरेंना भाजपने पक्षात घेवू नये, असे स्पष्ट मत भाजपाचे माण-खटाव विधानसभा अध्यक्ष डॉ. महादेव कापसे यांनी व्यक्त केले. दरम्यान आमदार गोरेंना भाजपमध्ये प्रवेश देवू नये, असा ठराव प्रमुख पदाधिकार्यांच्या बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आला आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या नियोजनार्थ भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख पदाधिकार्यांची बैठक दहिवडी येथील पक्ष कार्यालयात पार पडली. यावेळी जयकुमार गोरे यांना भाजपात प्रवेश देऊ नये, असा ठराव करण्यात आला. जयकुमार गोरे यांचा काँग्रेसमध्ये सध्या दंडेलशाही कारभार सुरु आहे. त्यामुळे त्यांच्या निकटचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते त्यांना सोडून गेले आहेत. त्यामुळे त्यांना भाजपमध्ये घेतल्यास पक्षाशी प्रामाणिक असणारे पदाधिकारी, कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक मिळण्याची शक्यता नाही.
ज्या उमेदवारावर विनयभंग, बलात्कार, फसवणुकीसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत, त्या उमदेवारास पक्षाने तिकिट देवू नये. सामान्य माणसाला तिकीट दिले तरी आम्ही स्वखर्चाने त्या उमेदवारास निवडून आणू. ज्याला पक्ष तिकीट देईल त्यांचे मनापासून काम करू. मात्र, गुन्हेगारी प्रवृत्तीला आम्ही साथ देणार नाही. त्याबरोबरच भाजपने माणच्या 32 गावांना पाणी मागणी केली आहे. हे पाणी भाजपाच पाणी देणार आहे. मात्र, आयत्या वेळी या कामाचे श्रेय घेण्याचे काम गोरे करत आहेत, असा आरोपही यावेळी कापसे यांनी केला.
यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष अनिल देसाई, उपाध्यक्ष विजयकुमार साखरे, जिल्हा नियोजन सदस्य बाळासाहेब खाडे, पंचायत समिती सदस्य तानाजी काटकर, शिक्षक आघाडी जिल्हाध्यक्ष प्रा. विश्वंभर बाबर, उपस्थित होते.