सातारा - महाविकास आघाडी सरकारच्या मागील अडीच वर्षाच्या काळात काँग्रेस-राष्ट्रवादीने शिवसेना संपवून टाकल्याचा घणाघाती आरोप राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाईंनी केला. हे दोन्ही पक्ष शिवसेना खाऊन टाकतील आणि आपला पक्ष संपवतील, हे आम्ही सांगितले होते, असा गौप्यस्फोटही देसाईंनी केला आहे. सातार्यातील शिंदे गटाच्या मेळाव्यात बोलताना केला. यावेळी कोरेगावचे आमदार महेश शिंदे उपस्थित shambhuraje desai attacks congress ncp होते.
'आपला पक्ष संपवतील, हे आम्ही सांगितले होते' - शंभूराजे देसाई बोलताना म्हणाले की, एका सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री करणार असल्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 2019 मध्ये सरकार स्थापनेवेळी केली होती. त्यामुळे भाजप-शिवसेना युती होणार, असे आम्हाला वाटले होते. मात्र, राष्ट्रवादी व काँग्रेस बरोबर आघाडी करून सरकार स्थापन केले जाणार असल्याचे समजताच एकनाथ शिंदेसह सर्व आमदारांनी त्याला विरोध केला होता. हे दोन्ही पक्ष शिवसेना खाऊन टाकतील आणि आपला पक्ष संपवतील, हे आम्ही सांगितले होते, असा गौप्यस्फोटही शंभूराजे देसाईंनी केला.
'संकल्पना शिवसेनेची, पण मंजुरी राष्ट्रवादीच्या लोकांना' - शिवभोजन केंद्र सुरु करण्याची संकल्पना उद्धव ठाकरे यांनी मांडली. मात्र, अडीच वर्षात एकाही शिवसैनिकाला शिवभोजन केंद्र मिळाले नाही. राष्ट्रवादी नेत्यांनी यादी दिली की त्यांना शिवभोजन केंद्र मंजूर व्हायचे, असा सर्व कारभार अडीच वर्षे सुरु होता. मागील अडीच वर्षात कोणताही निर्णय शिवसैनिकाच्या न्यायासाठी झाला नाही. आज मातोश्रीवर ओपन प्रवेश आहेत. परंतु, गेल्या अडीच वर्षात वेगळेच चित्र होते. मुख्यमंत्री दालनात कोविड होता, पण शेजारी असणार्या उपमुख्यमंत्र्यांच्या दालनात कोविड नव्हता, असे सांगत शंभूराजे देसाईंनी अप्रत्यक्षरित्या उध्दव ठाकरे यांना टोला लगावला.
'आम्हाला गद्दार म्हणणाऱ्यांचीच जनतेशी गद्दारी' - आम्ही जनतेशी गद्दारी केल्याचा आरोप करणार्यांनीच जनतेशी गद्दारी केली आहे. ठाकरे कुटुंबात दोन मंत्रीपदे असताना तुम्ही जनतेची सेवा न करता घरात बसलात. त्यामुळे खरे गद्दार तुम्ही आहात, असा हल्लाबोल कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी केला. सातारा जिल्ह्यात शिवसेना व भाजपची ताकद वाढवण्यावर आम्ही भर देणार आहोत. बाकीचे पण आमच्या बरोबर येणार असल्याचा दावा आमदार महेश शिंदे यांनी केला.