सातारा - जिल्हा रुग्णालयात ४ महिन्यांची गरोदर असलेली गतिमंद महिला उपचारासाठी दाखल झाली. तिच्या असहाय्यतेचा गैरफायदा कोणी घेतला हे तिलाही सांगता येईना. अशा विचित्र परिस्थितीत पोलिसांनी तपास सुरु केला अन् एका १७ वर्षीय युवकासह दोघांना बलात्कार प्रकरणी ताब्यात घेतले. संदीप उर्फ संतोष हणमंत निकम (२९ ता. जि. सातारा) असे अटकेत असलेल्या संशयिताचे नाव आहे.
हेही वाचा... जळगावातील 'त्या' बालिकेचा खूनच; अल्पवयीन मुलीवर गुन्हा दाखल
गतिमंद महिला गरोदर राहिल्याने नातेवाईकांनी तिला जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. त्याबाबत बोरगाव (ता. सातारा) पोलीस ठाण्याला कळवण्यात आले होते. बोरगाव पोलिसांनी याची गांभार्याने दखल घेत पीडित महिलेच्या मामाच्या तक्रारीवरुन अज्ञातांविरुध्द गुन्हा दाखल केला होता. पीडित महिलेवर गावातीलच काहीजणांनी तिच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेऊन वेळोवेळी बलात्कार केल्याचे निष्पन्न झाले. मात्र पीडितेला आरोपी कोण आहेत, याबाबत काही सांगता येत नव्हते. नातेवाईकांनाही संशयिताबाबत काहीच माहिती नव्हती. त्यामुळे पोलिसांपुढे तपासाचे मोठे आव्हान होते.
बोरगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय़्यक निरीक्षक चंद्रकांत माळी, तसेच सातारा महिला विशेष तपास पथकाच्या व निर्भया पथकाच्या प्रभारी अधिकारी माधुरी जाधव यांनी तपासाची रुपरेखा ठरवली. खुप कमी माहिती असताना देखील तपास पथकाने आटोकाट प्रयत्न करुन आरोपींचा शोध घेत एकाला अटक केली. त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली आणि आणखी एका साथिदाराची माहिती दिली. त्यावरुन तपास पथकाने तात्काळ दुसऱ्याही संशयितास ताब्यात घेतले असुन तो अल्पवयीन असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.