सातारा - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेला लॉकडॉऊन हळूहळू शिथिल केला जात आहे. जिल्ह्यातील सर्व दुकाने, उद्योग, अस्थापनांना सकाळी 9 ते सायंकाळी 7 या वेळात चालू ठेवण्यास तसेच जिल्ह्याअंतर्गत बससेवा 50 टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी असेल. तथापि जिल्हाबंदी कायम राहणार आहे. जिल्हाधिकारी यांच्या या आदेशाची अंमलबजावणी उद्या म्हणजे शनिवारपासून होणार आहे. दुचाकीवर दोन व्यक्तींना परवानगी दिली असली तरी त्यांना हेल्मेटचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे.
कोविड-19 च्या अनुषंगाने सुधारीत आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले आहेत. या सूचना व आदेश 1 ते 31 ऑगस्ट दरम्यान लागू राहतील. दुचाकीवर दोघांनाही मास्क व हेल्मेट बंधनकारक राहील. तीन चाकी वाहनात 1+2 व्यक्ती आणि चार चाकी वाहनात 1+3 व्यक्तींना परवानगी. मात्र, मास्क बंधनकारक राहील. जिल्ह्यातील सर्व मार्केट सायंकाळी सातपर्यंत चालू राहतील. पाच पेक्षा जास्त व्यक्ती दुकानात असल्यास अथवा सामाजिक अंतराचे पालन न केल्यास तत्काळ बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
लग्न व अंत्यसंस्काराला मर्यादा
प्रतिबंधित क्षेत्र वगळून लॉन, विना वातानुकूलित मंगल कार्यालय, हॉल, सभागृह, घर व घराच्या परिसरात 20 लोकांच्या मर्यादेत लग्नाशी संबंधित मेळावे, समारंभ घेता येईल. त्यास तहसीलदार यांची परवानगी बंधनकार राहील. अंत्यविधीसारख्या कार्यक्रमास 20 लोकांची मर्यादा आहे.
हे सुरू राहणार-
- सर्व दुकाने, शॉप, औद्योगिक व खाजगी आस्थापना चालू ठेवण्यास परवानगी
- क्षमतेच्या 50 टक्के जिल्ह्याअंतर्गत बस सेवा सुरू
- केश कर्तनालय, स्पा, सलून, ब्युटी पार्लरअटी व शर्तीवर परवानगी
- 5 ऑगस्टपासून मॉल आणि मार्केट कॉम्प्लेक्स चालू
- इंधन पंप व वैद्यकीय आस्थापना पूर्णवेळ चालू
याला असेल मनाई
- ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती, गर्भवती, 10 वर्षांखालील मुले यांना घराबाहेर पडण्यास प्रतिबंध
- चित्रपट गृहे, जिम, व्यायामशाळा, जलतरण तालाव, नाट्यगृह यासारख्या इतर सर्व जागा बंद
- सर्व सामाजिक, राजकीय, क्रिडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम, इतर मेळावे तसेच गर्दी होणारे कार्यक्रम, परिषदा बंद
- सर्व धार्मिक व प्रार्थना स्थळे सर्वसामान्यांसाठी बंद राहतील.
- हॉटेल आणि हॉस्पिटॅलिटी सर्व्हिसेस बंद, खाद्यपदार्थांची होम डिलिव्हरी करता येईल
- शाळा, कॉलेज, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था, कोचिंग इन्स्टिट्युट बंद
- आंतर राज्य व आंतर जिल्हा व्यक्तीच्या वाहतुकीस निर्बंध, तथापी शासकीय अधिकारी- कर्मचारी यांच्या प्रवासास मान्यता