सातारा : अजित पवारांबरोबर गेलेल्या अनेक आमदारांना परत यायचे असल्याचा गौप्यस्फोट माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कराडमध्ये माध्यमांशी बोलताना केला. (Maharashtra Political Crisis) संबंधितांनी खासदार शरद पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी संपर्क साधला असून अनेक आमदार परत राष्ट्रवादीमध्ये आलेले दिसतील. (Ajit Pawar rebellion) दोन दिवसात संपूर्ण चित्र स्पष्ट होईल, असा विश्वास अनिल देशमुख यांनी व्यक्त केला.
मविआसाठी पोषक वातावरण : महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष एकत्र आहेत. या संदर्भात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्याबरोबर माझी नुकतीच चर्चा झाली आहे. राज्यभर महाविकास आघाडीला वातावरण अतिशय चांगले आहे. पुढील सर्वच निवडणुका आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्रित लढणार आहोत. त्यामुळे राज्यात आणि देशामध्ये वेगळे चित्र निर्माण झालेले आपल्याला पाहायला मिळेल, असा विश्वास अनिल देशमुख यांनी व्यक्त केला.
माझ्यावरील आरोपांमध्ये तथ्य नाही: ईडी आणि सीबीआयच्या कारवाईची परिस्थिती सगळ्यांनाच माहीत आहे. अशा परिस्थितीमध्येही आम्ही सर्वजण एकत्र येऊन राष्ट्रवादी पक्षाला मजबूत करण्यासाठी काम करणार आहोत. मला खोट्या आरोपांमध्ये अडकवण्यात आले होते. माझ्यावरील आरोपांमध्ये तथ्य नाही, त्याचे कोणतेही पुरावे नाहीत. झालेले सर्व आरोप ऐकीव माहितीचे आहेत, असे उच्च न्यायालयाने सांगितले. त्यावर सुप्रीम कोर्टाने देखील शिक्कामोर्तब केल्याचे अनिल देशमुख म्हणाले.
पृथ्वीराज चव्हाणांसोबत बंदद्वार चर्चा: खासदार शरद पवार यांच्या समर्थनासाठी कराडमध्ये आलेल्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कराडच्या शासकीय विश्रामगृहात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी अर्धा तास कामराबंद चर्चा केली. या चर्चेचा तपशील समजू शकला नाही. मात्र, दोघांची सध्याच्या राजकीय परिस्थितीवर आणि भविष्यातील संभाव्य घडामोडींवर चर्चा झाली असावी, असा तर्क काढला जात आहे.
हेही वाचा: