सातारा - कोरोनाचा सर्वच क्षेत्रावर परिणाम झाला आहे. लाॅकडाऊनच्या काळात हातावर पोट असणाऱ्या अनेक लोकांच्या पोटाचा प्रश्न निर्माण झाला आहे. परंपरागत केरसुणी तयार करणाऱ्या व्यवसायिकांनाही या काळात अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. ग्रामीण भागातील बाजारपेठा सुरु करण्याची मागणीही या व्यवसयिकांनी केली आहे.
अनेक समाजातील लोकांना उदरनिर्वाहाचे साधन म्हणून परंपरागत केरसुणी तयार करण्याच्या व्यवसायाने आधार दिला आहे. उदरनिर्वाह होईल इतकी मिळकत नसली तरी आधार मात्र, ठरत असल्याचे दिसून येत आहे. सध्या केंद्र आणि राज्य सरकारच्या सूचनेनुसार संपूर्ण देश लॉकडाऊनमध्ये आहे. ग्रामीण भागात पुरेशा मजुरीअभावी अनेक मजुरांवरती उपासमारीची वेळ आलेली आहे. हाती आलेला पैसा संपला असल्यामुळे मजुरांवरती रोजगाराअभावी उपासमारीची वेळी आलेली आहे. तयार केलेला माल विकला जात नसल्याने मजुरांचा दैनंदिन रोज बुडत आहे. यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा हा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा कठीण प्रसंगी केरसुणी (झाडू) बनवण्याचा परंपरागत व्यवसाय या मागासलेल्या समूहासाठी आधारभूत ठरत आहे.
लॉकडाऊनमुळे सध्या संपूर्ण बाजारपेठ बंद असल्याने ग्रामीण भागात केरसुणीला चांगली मागणी वाढत आहे. केरसुणी बनवणारे लोक दारिद्र्य रेषेखाली आहेत. लॉकडाउनच्या काळात या समाजातील लोकांना केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने मोफत अन्न-धान्याच्या स्वरूपात मदत करण्यात येत आहे. धान्याबरोबर लागणारे किराणा साहित्य घेण्यासाठी पैश्याची गरज भासत आहे. यामुळे ही मदत पुरेशी नसल्याने या समूहावर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.