सातारा - पाटण तालुक्यातील मल्हारपेठ पोलीस दूरक्षेत्राला स्वतंत्र पोलीस स्टेशनचा दर्जा मिळाला आहे. मल्हारपेठ आणि चाफळ या दूरक्षेत्रांतर्गत येणार्या 70 गावांचा यात समावेश करण्यात आला असुन स्वतंत्र पोलीस ठाण्याची मान्यता देण्यात आली आहे.या पोलीस ठाण्यासाठी अधिकारी, कर्मचारी मिळून 30 पदांना मंजुरी देण्यात आली आहे.
पाटण आणि उंब्रज पोलीस ठाण्यांचे विभाजन आणि मल्हारपेठ व चाफळ दूरक्षेत्राचे उन्नतीकरण करून नवीन मल्हारपेठ पोलीस ठाणे निर्माण करण्याचा प्रस्ताव यापुर्वीच पोलीस महासंचालकांना सादर करण्यात आला होता. अखेर त्याला शासनाने परवानगी दिली असुन मल्हारपेठ पोलीस दूरक्षेत्राला स्वतंत्र पोलीस स्टेशनचा दर्जा मिळाला आहे.
सातारा जिल्हा पोलीस दलाकडे उपलब्ध असलेल्या मनुष्यबळातील सहायक पोलीस निरीक्षक-1, पोलीस उप निरीक्षक-1, सहाय्यक फौजदार-3, पोलीस हवालदार-4, पोलीस नाईक-7, पोलीस शिपाई-14, अशा एकूण 30 पदांना मंजुरी देण्यात आली आहे.
मल्हारपेठ आणि चाफळ पोलीस दूरक्षेत्र हे मूळच्या पाटण तालुक्यात येतात. परंतु, चाफळ दूरक्षेत्रात कराड तालुक्यातील उंब्रज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काही गावे समाविष्ट आहेत.या सर्व गावांचा आता मल्हारपेठ पोलीस स्टेशन हद्दीत समावेश करण्यात आला आहे. तर, या पोलीस स्टेशनच्या निमित्ताने सातारा जिल्ह्यात आणखी एक पोलीस स्टेशन वाढले आहे.
त्याचप्रमाणे, मलकापूर स्वतंत्र पोलीस ठाणे करण्याची मागणी असून या संदर्भात प्रस्तावही यापुर्वीच शासनाकडे पाठविण्यात आला आहे. परंतु, तो अद्यापही प्रलंबित आहे. तसेच, जिल्ह्यात एकूण चार ठिकाणी स्वतंत्र पोलीस ठाण्याच्या निर्मितीचा प्रस्ताव होता. मात्र त्यापैकी मल्हारपेठ पोलीस ठाण्याचा प्रस्ताव मंजुर झाला आहे.