सातारा- कोरेगाव तालुक्यात गेल्या आठवड्यात गांजा तस्करीचे रॅकेट आयपीएस रितू खोखर यांनी उध्दवस्त केल्यानंतर आता रॅकेटच्या मुख्य सुत्रधारापर्यंत पोहोचण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. खटाव आणि माण तालुक्यातील दोघांना अटक केल्यानंतर आता गांजा जेथून पुरवला जातो, त्या ठिकाणी म्हणजेच काळमळ (पिलीव), ता. माळशिरस येथे बुधवारी रात्री धडक कारवाई करत मुख्य सुत्रधाराला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून २ लाख ९५ हजार ४१० रुपये किंमतीचा ४९ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी माळशिरस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण-
१३ नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास सातारा-लातूर महामार्गावर चिमणगाव गोठ्यानजिक होंडा ऍक्टिव्हा स्कुटरवरुन गांजाची तस्करी होणार असल्याची माहिती रितू खोखर यांना मिळाली होती. त्यांनी विशेष पथक तयार करुन होंडा ऍक्टिव्हा स्कुटर क्र. एम. एच. ११-बी. वाय.-३०९१ वरुन चाललेल्या हसिम नजीर झारी व सचिन तुकाराम मदने, दोघे रा. पुसेगाव यांना ताब्यात घेतले होते. त्यांच्या कबज्यातून ४ किलो १८५ ग्रॅम गांजासह मोबाईल व इतक एकूण ७७ हजार ८३० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला होता. या दोघांची कसून चौकशी केल्यावर त्यांनी दहिवडीतील बाजार मैदानाजवळ राहत असलेल्या सुनील किसन जाधव व प्रकाश अशोक जाधव यांच्याकडून गांजा खरेदी करत असल्याची कबुली दिली होती.
दहिवडीत दोघांना अटक-
रितू खोखर यांच्या पथकाने त्याच रात्री दहिवडीत धडक कारवाई करत सुनील किसन जाधव व प्रकाश अशोक जाधव या दोघांना अटक केली. तसेच त्यांच्या घराची झडती घेण्यात आली. या कारवाईत ६३ हजार ५७० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. त्यांच्याविरुध्द कोरेगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांना पोलीस कोठडी देण्यात आली होती.
पिलीवपर्यंत धागेदोरे -
तपासादरम्यान दहिवडीतील दोघांनी काळमळ (पिलीव), ता. माळशिरस येथील लक्ष्मण रामू जाधव याच्याकडून गांजा खरेदी करत असल्याची कबुली दिली होती. त्यानंतर बुधवारी रात्री रितू खोखर यांच्या पथकाने काळमळ (पिलीव) येथे छापा टाकून जाधव याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून २ लाख ९५ हजार ४१० रुपये किंमतीचा ४९ किलो गांजा जप्त करण्यात आला. याप्रकरणी माळशिरस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.