कराड (पाटण) - कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील कोयना, नवजा आणि महाबळेश्वरमध्ये सोमवारपासून पावसाचा जोर वाढला आहे. मुसळधार पावसामुळे कोयना धरणात प्रति सेकंद ३० हजार क्युसेक पाण्याची आवक होत आहे. बुधवारी सकाळी कोयना धरणातील पाणीसाठा 57.7 टीएमसी झाला आहे.
सर्वत्र मुसळधार
कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. रविवारी (दि. 18) कोयना धरणातील पाणीसाठ्याने पन्नाशी ओलांडली होती. त्यानंतर पावसाचा जोर वाढल्याने दोन दिवसात कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात तब्बल 7 टीएमसीने वाढ झाली आहे. कोयना पाणलोट क्षेत्रातील कोयनानगर, नवजा आणि महाबळेश्वर या ठिकाणी पावसाची संततधार असून कोयना जलाशयात प्रति सेकंद 30 हजार क्युसेक पाण्याची आवक होत आहे. रविवारी (दि. 18) सकाळी कोयना धरणातील पाणीसाठा 50 टीएमसी होता, तर आज (बुधवारी) सकाळी पाणीसाठा 57.7 टीएमसी झाला आहे. धरण पाणलोट क्षेत्रात 1 जूनपासून 18 जुलैपर्यंत केवळ 25 टक्केच पाऊस झाला होता. परंतु, आता पावसाचा जोर वाढला असून सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू आहे.
भात लागणीच्या कामाची धांदल
कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस सक्रिय होऊन 50 दिवस झाले आहेत. 1 जूनपासून आजअखेर कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात 29 टीएमसीने वाढ झाली आहे. त्यामुळे सध्या धरणातील पाणीसाठा 57 टीएमसीवर पोहोचला आहे. मुसळधार पावसाला सुरूवात झाल्यामुळे कोयना धरणाची पाणीपातळी झपाट्याने वाढू लागली आहे. पावसामुळे कोयना, पाटण भागात भात लागणीच्या कामालादेखील वेग आला आहे. खाचरांमध्ये भात लागणीच्या कामाची धांदल सुरू असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
सातारा जिल्ह्यात 24 तासात सरासरी 19.8 मिलीमीटर पाऊस
सातारा जिल्ह्यात काल (मंगळवार) दिवसभरापासून बुधवारी सकाळी 10 वाजेपर्यंत एकूण सरासरी 19.8 मिलीमीटर पाऊस झाला आहे, तर आतापर्यंत सरासरी 119.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात बुधवारी सकाळी 10 वाजेपर्यंत (24 तासात) झालेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी, कंसात एकूण पाऊस मिलीमीटरमध्ये -
- सातारा - 23.3 (91.7)
- जावळी - 47 (154.8)
- पाटण - 35 (157.5)
- कराड -14 (75.0)
- कोरेगाव - 9.7 (84.7)
- खटाव - 7.8 (46)
- माण - 3.6 (118.3)
- फलटण - 0.7 (65.4)
- खंडाळा - 2.7 (45)
- वाई - 18.3 (120.4)
- महाबळेश्वर - 85.6 (636.3)