सातारा - राजकीय परंपरा, मातब्बर उमेदवार आणि तिरंगी लढतीमुळे उत्सुकता लागून राहिलेल्या 'कराड दक्षिण' कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून अखेर महाआघाडीचे उमेदवार, माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान आ. पृथ्वीराज चव्हाण यांनीच बाजी मारली. त्यांच्यासमोर महायुतीचे उमेदवार डॉ. अतुल भोसले आणि विलासकाका उंडाळकरांचे पूत्र अॅड. उदयसिंह पाटील यांचे आव्हान होते. तरीही, चव्हाण हे दुसर्यांदा बाजी मारण्यात यशस्वी ठरले. आ. चव्हाण यांना 92 हजार 296 मते मिळाली. 9 हजार 130 एवढ्या मताधिक्याने ते विजयी झाले. चव्हाण यांचे प्रमुख विरोधक डॉ. अतुल भोसले यांना 83 हजार 166 आणि अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांना 29 हजार 401 मते मिळाली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी कराड दक्षिणमधील महायुतीचे उमेदवार डॉ. अतुल भोसले यांना गेली दोन-तीन वर्षे मोठी ताकद तसेच विकासकामांसाठी निधीही दिला होता. तसेच, त्यांच्या प्रचारासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनीही कराडच्या स्टेडियममध्ये सभा घेतली. कराड नगरपालिकेच्या अनेक विद्यमान व माजी नगरसेवकांनी डॉ. भोसले यांना पाठिंबा दिला होता. या सर्व कारणांमुळे डॉ. भोसले यांचे आ. चव्हाण यांच्यापुढे तगडे आव्हान होते. याशिवाय, माजी सहकार मंत्री विलासकाका उंडाळकर यांचे पुत्र अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर हेदेखील रिंगणात होते. अशा तिरंगी लढतीमुळे आ. चव्हाण यांच्या पुढील अडचणी वाढल्या होत्या. तरीही, मुख्यमंत्री असताना केलेली विकासकामे, स्वच्छ प्रतिमा आणि संयमी प्रचार, या जोरावर त्यांना विजयापर्यंत पोहोचता आले.
याउलट, डॉ. अतुल भोसले आणि भाजप नेत्यांनी आपल्या विकासकामांपेक्षा पृथ्वीराज चव्हाणांवर टीका करण्यात आपली ताकद खर्च केली. कराड दक्षिणमधील मतदारांच्या ते पचनी पडले नाही. दुसरीकडे आ. चव्हाण यांनी मोदी आणि शहा यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत, भाजप सरकारच्या योजना आणि कारभारावरही जोरदार हल्लाबोल केला. मोदी, शहा यांना जाहीर सभांमधून अनेक सवाल करत त्याचे उत्तर देण्याचे आव्हान दिले. त्यामुळे, अभ्यासू लोकप्रतिनिधी म्हणून आ. चव्हाण यांच्याबद्दल कराड दक्षिणच्या मतदारांमध्ये सहानुभूती निर्माण झाली. ती सहानुभूतीच आ. चव्हाण यांना विजयापर्यंत घेऊन गेली. आ. चव्हाण यांनी त्यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांना संयमाने प्रत्युत्तर दिले. खालच्या पातळीवर जाऊन टीका करणे टाळले. अशा अनेक बाबी त्यांच्या पथ्यावर पडल्या आणि अखेर मतदारांनी त्यांनाच आपला लोकप्रतिनिधी म्हणून पसंती दिली.
आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी विजयी सभेत विरोधी उमेदवार डॉ. अतुल भोसले यांचा नामोल्लेख टाळत जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, कराड दक्षिणमध्ये सरकारी सत्तेचा गैरवापर आणि अर्थिक ताकदीचा वापर निवडणुकीत झाला. विरोधी उमेदवाराने त्यांच्या संस्थात्मक व्यवस्थेचाही वापर केला. या सगळ्यांबरोबरच काँग्रेसच्या काही नेत्यांना पाडण्यासाठी सुपारी घेऊन मंत्रीमंडळ सरसावले होते. विरोधकांनी विचाराने आणि संयमाने राजकारण करावे, असेही ते म्हणाले. दहशत निर्माण करून आणि पैशाच्या मस्तीने कधी राजकारण होत नाही, असा टोलादेखील त्यांनी विरोधी उमेदवार डॉ. भोसले यांना लगावला.