सातारा - उंच डोंगर, खोल दऱ्या, हिरवागार परिसर आणि रपरपणारा पाऊस यासाठी मान्यता पावलेल्या मिनी काश्मीर महाबळेश्वरने यंदा सव्वाशे वर्षांतला विक्रमी पाऊस अनुभवला. २२ व २३ जुलै या दोन दिवसात तब्बल १ हजार ७४.०४ मिलिमिटर पावसाची नोंद झाली.
महाबळेश्वरला २२, २३ व २४ जुलैला आत्तापर्यंतचा रेकॉर्डब्रेक पाऊस झाल्याची नोंद हवामान खात्यांमध्ये झाली आहे. महाबळेश्वरच्या हवामान खात्यातील वैज्ञानिक सहाय्यक विशाल रामचंद्रन यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाबळेश्वर येथे २२ जुलै रोजी ४८० मिमी पावसाची नोंद झाली. त्याच्या दुसऱ्या दिवशी २३ जुलै रोजी ५९४.४ मिमी पावसाची नोंद झाली होती. यापूर्वी ७ जुलै १९७७ रोजी एकाच दिवशी ४३९.८ मिमी पावसाची विक्रमी नोंद होती. यापूर्वी ७ जुलै १९७७ रोजी एकाच दिवशी ४३९.८ मिमी पावसाची विक्रमी नोंद होती. जुलै महिन्यातील २४ तासात पडलेला हा आजवरचा विक्रमी पाऊस होता. २३ जुलैच्या पावसाने सव्वाशे वर्षांपुर्वीचा स्वत:चा विक्रम मोडला. २३ व २४ या दोन दिवसात १ हजार ७४.०४ मिलिमिटर पाऊस महाबळेश्वरमध्ये बरसला.
केवळ ८ दिवसात २१०० मिमी नोंद
महाबळेश्वरला २४ जुलै रोजी ३२१ मिमी पाऊस झाला. या तीन दिवसात एकूण १३९५.५ मिलिमिटर इतका उच्चांकी पाऊस झाला. हवामान खात्याकडे १८९६ पासून पावसाच्या नोंदी आढळून येतात. या नोंदीनुसार महाबळेश्वरमध्ये जुलै महिन्यात सरासरी २०६४.४ मिमी पाऊस होतो. यंदा गेल्या १९ जुलैपासूनच केवळ ८ दिवसात २१०० मिमी पावसाची नोंद झाली असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.
त्यामुळे महाबळेश्वरला जास्त पाऊस
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने पश्चिमीकडील वा-याचा जोर वाढला. त्यावेळी पश्चिम किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले होते. त्याचा परिणाम होऊन बाष्प घेऊन येणारे ढग महाबळेश्वरच्या डोंगररांगांना धडकून ते वर जात होते. ढग तयार झाल्याने महाबळेश्वरला कमी वेळेत अधिक पाऊस झाला. महाबळेश्वरप्रमाणेच सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये पाटण, जावळी या तालुक्यांत अनेक ठिकाणी ही परिस्थिती होती. मात्र, त्या ठिकाणी पडलेला पाऊस मोजला गेला नसल्याने त्याची नोंद होऊ शकली नाही.